सहा हरवलेल्या मुलांनाही शोधले : नाताळच्या दिवसांत समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी

पणजी : नाताळच्या (Christmas) दिवसांत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर (Goa Beaches) होणारी गर्दी लक्षात घेऊन जीवरक्षकांना (Life Guard) सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. जीवरक्षकांनी एकाच दिवशी सहा जणांना बुडताना वाचवले तर सहा बेपत्ता मुलांना शोधून काढले.
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर देखरेख ठेवणारे जीवरक्षक या दिवसांत सु्ट्टी असल्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन अधिक सतर्क बनले आहेत. त्याचबरोबर कुणीही समुद्रात बुडत असल्यास किंवा संभाव्य धोका टाळण्यासाठी यंत्रणाही सज्ज ठेवली आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर नाताळच्या दिवशी एकूण सहा जणांना वाचवले तर सहा लहान मुलांना शोधून काढले. जीवरक्षकांनी जेलीफिशच्या दंशाच्या दोन प्रकरणांवरही उपचार केले. खडकाळ समुद्रकिनाऱ्यावर घसरून जखमी झालेल्या एका रशियन पर्यटकाला वैद्यकीय मदत पुरवली.
हरमल समुद्रकिनाऱ्यावर, म्हापसा येथील येथील एका ३३ वर्षीय महिलेला तलावात अडचणीत सापडल्यानंतर तिला वाचवण्यात आले. समुद्रकिनाऱ्यावर आपल्या कुटुंबापासून विलग होऊन दुसरीकडेच पोचलेल्या एका सात वर्षांच्या मुलीला टॉवर कर्मचारी आणि वाहन गस्त पथकांच्या समन्वयाने शोधून तिच्या कुटुंबाच्या स्वाधिन केले.
हैदराबाद येथील २३ वर्षीय दोन युवक मांद्रे येथे समुद्रातील खोल पाण्यात बुडत असताना त्यांना वाचवले. जेट स्कीच्या मदतीने जीवरक्षकांनी बचाव उपकरणांचा वापर करून दोघांनाही सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. मोरजी समुद्रकिनाऱ्यावर मुंबईतील एक पुरुष आणि महिला समुद्रात बुचकळत असताना त्यांना सुखरूप बाहेर काढले.
बागा समुद्रकिनाऱ्यावर, वेगवेगळ्या वेळी तीन मुले बेपत्ता झाली. या मुलांना किनाऱ्यावरील गर्दीतून शोधून काढून कुटुंबाकडे सोपवले. कळंबोली येथील तीन वर्षांचा मुलगा कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर हरवला. मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा मुलगा एकटाच होता. त्याला कुटुंबाच्या स्वाधिन केले.
कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर, पंजाबमधील सात वर्षांचा मुलगा पोहत असताना बुडू लागला. त्याला जीवरक्षकांनी तत्काळ धाव घेऊन वाचवले. मुंबईची तीन वर्षांची मुलगी हरवली होती, तिला शोधून तिच्या कुटुंबाकडे सोपवले.
जम्मू आणि काश्मीरमधील २० वर्षीय पर्यटक आणि पुण्यातील १० वर्षांच्या मुलावर अनुक्रमे बायणा आणि बाणावली समुद्रकिनाऱ्यांवर जेलीफिशचा दंश झाल्यानंतर जीवरक्षकांनी त्यांच्यावर उपचार केला. पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर, खडकावर घसरलेल्या ४२ वर्षीय रशियन पर्यटकाच्या दोन्ही पायांना खोल जखमा झाल्या होत्या. त्याला तातडीने प्रथमोपचार देण्यात आले आणि पुढील वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले.