गोवा : राज्यात पालिकाक्षेत्रांत दररोज जमा होतो १९३ टन कचरा!

८७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया : नगरविकास खात्याच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अहवालातून माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
गोवा : राज्यात पालिकाक्षेत्रांत दररोज जमा होतो १९३ टन कचरा!

पणजी : राज्यातील पालिका क्षेत्रांमध्ये मागील वर्षी दररोज सरासरी १९३ टीपीडी (टन्स पर डे) कचरा (garbage) जमा झाला. या कचऱ्यापैकी ८७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे, मात्र त्यावरील प्रक्रिया करण्याचे प्रमाण किंचित घटले आहे. दरम्यान, सर्वच नगरपालिकांमध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात असल्याची माहिती नगरविकास खात्याच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अहवालात देण्यात आली आहे.

अहवालातील माहितीनुसार, राज्यातील शहरी भागांत एकूण १,००२ टीपीडी कचरा जमा झाला. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे वार्षिक सरासरी प्रमाण ८० टक्के आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत कचऱ्यावरील प्रक्रिया करण्याच्या प्रमाणात बरीच घट झाली आहे.

कचरा निर्मिती आणि प्रक्रिया...
- २०२० : एकूण २५० टीपीडी कचरा जमा झाला आणि ७० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली.
- २०२१ : कचऱ्याचे प्रमाण २५० टीपीडी राहिले, पण प्रक्रिया करण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांपर्यंत वाढले.
- २०२२ : कचऱ्याचे प्रमाण घटून १२८ टीपीडीवर आले आणि प्रक्रिया करण्याचे प्रमाण ८८ टक्क्यांपर्यंत खाली आले.
- २०२३ : कचऱ्याचे प्रमाण वाढून १८१ टीपीडी झाले आणि प्रक्रियेत किंचित घट होऊन ८७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया झाली.
- २०२४ : कचऱ्यात वाढ होऊन तो १९३ टीपीडीपर्यंत पोहोचला आणि ८७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली.
..................
गेल्या ५ वर्षांत कचरा वर्गीकरणात वाढ
पालिका क्षेत्रांमध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे आणि त्याचे वर्गीकरण करण्याचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत बरेच वाढले आहे. २०२० मध्ये २१७ पालिका प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात होता, जे २०२४ मध्ये २२५ प्रभागांपर्यंत पोहोचले आहे. तसेच, २०२० मध्ये फक्त १७३ प्रभागांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण केले जात होते, २०२४ मध्ये हे प्रमाण २२५ प्रभागांपर्यंत पोहोचले आहे.

तुलनात्मक आकडेवारी
वर्ष.. कचरा गोळा करणारे प्रभाग.. कचरा वर्गीकरण करणारे प्रभाग
२०२० २१७ १७३
२०२१ २१७ १७३
२०२२ २२६ २१३
२०२३ २२६ २१८
२०२४ २२५ २२५

हेही वाचा