रात्री ९ नंतर किनारी भागांसह मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी

पणजी : नवीन वर्ष (New year celebration in Goa) जवळ आल्याने राज्यात वाहनांची संख्या वाढत आहे. अपघात तसेच वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून (Goa traffic police) नाकाबंदी तसेच वाहनांची तपासणी केली जाणार आहे. रात्री ९ नंतर समुद्रकिनारी भागांसह मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी असेल. अल्कोमीटरच्या साहाय्याने चालकांची तपासणी केली जाईल, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवईकर (Prabodh Shirvoikar) यांनी दिली.
नाताळनंतर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक (tourist in Goa) राज्यात येऊ लागले आहेत. यामुळे दररोज वाहनांची संख्या वाढत आहे. पणजीसह म्हापसा, मडगाव, वास्को, फोंडा या मुख्य शहरांमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कळंगुट, बागा, हणजूण, मोरजी, कोलवा, बोगमाळो, काणकोण या भागात वाहनांची संख्या वाढत आहे. यामुळे किनारी भागात स्थानिक पोलिसांसह ३०० हून अधिक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वत्र नाकाबंदी असेल. बाहेरील राज्यातील तसेच संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाईल.
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी अनेकजण मद्यप्राशन करून गाडी चालवतात, ज्यामुळे अपघात होतात. त्यामुळे अल्कोमीटरद्वारे चालकांची तपासणी केली जाणार आहे.
वाहतूक नियंत्रणाचे मोठे आव्हान
नवीन वर्षासाठी इतर राज्यांतील पर्यटक स्वतःच्या गाड्या घेऊन गोव्यात येतात. यामुळे वाहनांची संख्या दुप्पट होते. साहजिकच वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान गोवा पोलिसांसमोर असते.