शहापूर वस्तीमुळे मगोचा उमेदवार जिंकला : विश्वेश; आरजीपीची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ : सुदिन

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर (ZP election Goa) मगोचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavlikar) आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे सरचिटणीस विश्वेश नाईक (Vishvesh Naik) यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. ‘स्वाभिमानी गोमंतकीयांनी आरजीपीला मतदान केले, तर मगो हा शहापूर वस्तीच्या जोरावर निवडून आला आहे’, असा आरोप विश्वेश नाईक यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना, आरजीपीची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली असून भविष्यात त्यांची स्थिती आम आदमी पार्टीपेक्षाही वाईट होईल, असे सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे.
कवळे मतदारसंघात जिल्हा पंचायत निवडणुकीत मगो आणि आरजीपी हे दोनच पक्ष आमने-सामने होते. यात आरजीपीचे उमेदवार विश्वेश नाईक यांचा पराभव झाला. मात्र यानंतर एका सभेत भाषण करताना ढवळीकर यांनी आरजीपीला लक्ष्य केले होते, ज्यावरून विश्वेश नाईक यांनी ढवळीकरांवर टीकास्त्र सोडले.
आरजीला स्वाभिमानी लोकांची मते : विश्वेश
विश्वेश नाईक यांनी म्हटले की, सुदिन ढवळीकर हे आरजीपीला घाबरतात, असे रवी नाईक म्हणाले होते आणि ते आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आम्हाला मडकई मतदारसंघात ४,५०० मते मिळाली आहेत आणि ही स्वाभिमानी गोमंतकीयांची मते आहेत. ही मते पैसे देऊन किंवा दारू वाटून मिळालेली नाहीत. सभेत बोलताना सुदिन ढवळीकर किती खरे आणि किती खोटे बोलतात, हे सर्वांना ठाऊक आहे. शहापूर वस्तीतून दुपारी तीननंतर अचानक मतदान कसे झाले? या लोकांचे या पक्षावर इतके प्रेम का जडले, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे.
‘आप’पेक्षाही वाईट अवस्था आरजीपीची होईल : सुदिन
सुदिन ढवळीकर यांनी नाईक यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले की, आरजीपीला नक्की काय करायचे आहे हेच ठाऊक नाही. त्यांच्याकडे कोणताही अजेंडा नाही. त्यांना दिल्ली, मुंबई किंवा खोर्ली कुठेही बोलावले तरी ते जातात, पण का जातात हेच त्यांना माहीत नसते. गोव्यात येणारे प्रकल्प बंद पाडण्यासाठी आरजीपी नेहमीच पुढे असते. गोव्याच्या विकासात आतापर्यंत त्यांचे योगदान शून्य आहे. स्वतःचे काहीही योगदान नसताना दुसऱ्यांच्या गावात जाऊन ते नको त्या गोष्टी करतात. आज ते ज्या झोपडपट्टीबद्दल बोलत आहेत, त्यांना कदाचित हे माहीत नसेल की मी १९६८ मध्ये शाळेत जात होतो, तेव्हापासून ती झोपडपट्टी तिथे आहे. ती काही नवीन वस्ती नाही. गोव्यात जशी ‘आप’ची स्थिती झाली, त्यापेक्षाही वाईट अवस्था थोड्याच दिवसांत आरजीपीची होईल.