बांगलादेशातील अस्वस्थतेचा धोका

केवळ भाजप नेत्यांनी नव्हे तर बसपा प्रमुख मायावती, शशी थरूर, डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांनीही बांगलादेशातील घटनांवर नाराजी व्यक्त केली आहे आणि भारत सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

Story: संपादकीय |
3 hours ago
बांगलादेशातील अस्वस्थतेचा धोका

दक्षिण आशियातील राजकीय नकाशावर बांगलादेश हा भारतासाठी केवळ शेजारी देश नाही, तर सुरक्षा, व्यापार आणि राजकारणाचा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र अलीकडच्या महिन्यांत बांगलादेशमधील वाढती हिंसा, विद्यार्थी-कामगार आंदोलन, सरकारी संस्थांवरील हल्ले आणि सत्तेविरोधी संताप पाहता एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे की शेख हसिनांचे युग संपत चालले आहे की त्या पुन्हा एकदा परिस्थितीवर मात करतील? त्या देशातील सध्याची हिंसा ही एखाद्या एका निर्णयामुळे उसळलेली नाही. दीर्घकाळ चाललेली आर्थिक अस्थिरता, बेरोजगारी, महागाई, चलनघसरण, सरकारी नोकऱ्यांतील आरक्षणावरून निर्माण झालेला असंतोष, विरोधकांवर दडपशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील मर्यादा अशी कारणे त्यामागे आहेत. विद्यार्थी आंदोलन हे निमित्त ठरले, पण प्रत्यक्षात सामान्य जनतेचा साचलेला रोष रस्त्यावर उतरला. पोलीस-नागरिक संघर्ष, सरकारी इमारतींवर हल्ले, जाळपोळ या साऱ्या घटना राज्यसत्तेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करतात.

भारतात आसरा घेतलेल्या त्या देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसिना या दक्षिण आशियातील सर्वात दीर्घकाळ सत्तेत असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे बलस्थाने तशी स्पष्ट आहेत. कट्टर इस्लामी दहशतवादाविरोधातील कठोर भूमिका, पाकिस्तानविरोधी आणि भारतस्नेही धोरण, पायाभूत सुविधा, वीज, वस्त्रोद्योगातील वाढ, लष्कर व प्रशासनावर मजबूत पकड ही त्यांच्या राजवटीतील वैशिष्ट्ये मानता येतील. हसिना यांनी यापूर्वीही अनेकदा आंदोलने, राजकीय संकटे आणि आंतरराष्ट्रीय टीकेला सामोरे जात सत्ता टिकवली आहे. त्यामुळेच हसिना संपल्या असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.

या पार्श्वभूमीवर यावेळचे संकट अधिक गंभीर असल्याचे दिसते आहे. जनतेतील भीतीऐवजी संताप वाढला आहे. विद्यार्थी आणि मध्यमवर्गीयांमध्ये नाराजी पसरली आहे. ती पारंपरिक विरोधकांपेक्षा अधिक धोकादायक आहे. याचाच परिणाम म्हणून त्या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. एका आठवड्यात दुसऱ्यांदा हिंदू युवक अमृत मंडल यांना जमावाने मारले आहे. यापूर्वीही दीपू चंद्रदास नावाच्या हिंदू युवकाची क्रूर लिंचिंग झाली होती, ज्यावर देशात आणि भारतात प्रचंड प्रतिक्रिया उमटली होती. या घटनांनी बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढली आहे. हिंदूंची घरे जाळण्यात आल्याचे आणि काही कुटुंबांनी गाशा गुंडाळून जीव वाचवला, असे स्थानिक अहवालही समोर आले आहेत. हिंदू संघटनांनी मोठ्या प्रमाणावर विरोध आणि आंदोलने केली आहेत. विविध शहरांमध्ये पुतळे जाळण्यापासून ते भारत सरकारकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली जात आहे. केवळ भाजप नेत्यांनी नव्हे तर बसपा प्रमुख मायावती, डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांनीही घटनांवर नाराजी व्यक्त केली आणि भारत सरकारकडे तीव्र हस्तक्षेपाची मागणी केली आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी हत्येची अत्यंत अन्यायकारक अशी निंदा केली आणि बांगलादेश सरकारकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. रशियाचे दूतावास, तसेच अमेरिका आणि कॅनडाच्या पार्लमेंटमध्येही अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसेची निंदा केली आहे.

बांगलादेशात सत्तापालट झाल्यास काही बदल होतील, अशी अपेक्षा आहे. शेख हसिना पुन्हा सत्तेवर आल्यास आणि पुन्हा स्थैर्य निर्माण करायचे असेल, तर केवळ दडपशाही पुरेशी ठरणार नाही. त्यांना सध्याची अस्वस्थता नियंत्रणात आणावी लागेल. त्यासाठी आरक्षण व आर्थिक प्रश्नांवर माघार घेत संवाद वाढवावा लागेल. भारतासाठी बांगलादेशातील अस्थिरता म्हणजे सीमावर्ती सुरक्षेवर परिणाम, घुसखोरी व तस्करीचा धोका आणि चीनचा वाढता हस्तक्षेप शक्य आहे. शेख हसिना सत्तेत राहणे हा भारतासाठी तुलनेने सुरक्षित पर्याय मानला जातो, मात्र भारतालाही लोकशाही मूल्ये आणि स्थैर्य यांचा समतोल राखावा लागेल. शेख हसिना अजूनही संपलेल्या नाहीत. त्यांच्याकडे सत्ता टिकवण्याची क्षमता, यंत्रणा आणि अनुभव आहे. मात्र जनतेचा आवाज दीर्घकाळ दाबता येत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी जर आत्मपरीक्षण केले, तर त्या पुन्हा एकदा बांगलादेशला स्थैर्याकडे नेऊ शकतात. अल्पसंख्याकांना संरक्षण देऊ शकतील. सध्या तरी त्या देशातील अराजक थांबविण्यासाठी तेथील सत्ताधाऱ्यांना तातडीने पावले उचलावी लागतील.