सत्तापालटानंतर ढाका-दिल्ली संबंध रसातळाला

Story: विश्वरंग - बांगलादेश |
3 hours ago
सत्तापालटानंतर ढाका-दिल्ली संबंध रसातळाला

१९७१ मध्ये भारताच्या सक्रिय मदतीने ज्या बांगलादेशाचा जन्म झाला, तोच देश आज भारतासाठी सर्वात मोठी राजनैतिक डोकेदुखी ठरत आहे. बांगलादेशातील रस्त्यांवर भारतविरोधी घोषणा, भारतीय उच्चायुक्तालयांबाहेर होणारी निदर्शने, राजदूतांना बजावण्यात येणारे समन्स आणि हिंदू अल्पसंख्याकांवरील वाढते हल्ले यामुळे दिल्ली आणि ढाकामधील संबंध आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत.

एकेकाळी भारताचा घनिष्ठ मित्र असलेला बांगलादेश आता शत्रूच्या भूमिकेत दिसत आहे. अनेक राजकीय विश्लेषक विचारत आहेत की, भारताने ज्या ‘धाकट्या भावाला’ निर्माण केले, तो आता आपल्याच निर्मात्याच्या विरोधात उभा ठाकलेला ‘फ्रँकेनस्टीनचा राक्षस’ बनला आहे का? १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘मुक्ती वाहिनी’ला पाठिंबा देऊन पाकिस्तानच्या अत्याचारातून बांगलादेशला मुक्त केले होते. शेख हसीना यांच्या सत्ताकाळात (२००९-२०२४) दोन्ही देशांनी व्यापार, संरक्षण आणि कनेक्टिव्हिटीमध्ये ऐतिहासिक प्रगती केली होती, मात्र २०२४ मधील सत्तापालटानंतर सर्व समीकरणे बदलली आहेत.

शेख हसीनांच्या राजीनाम्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार आल्यापासून बांगलादेशचा कल बीजिंग आणि इस्लामाबादकडे झुकला आहे. युनूस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भारताच्या सुरक्षिततेबाबत, विशेषतः संवेदनशील ‘चिकन नेक’ कॉरिडॉरबाबत चिंता वाढली आहे. बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून हिंदू समुदायाला लक्ष्य केले जात आहे. अलिकडेच मयमनसिंह येथे दीपू चंद्र दास या हिंदू व्यक्तीची जमावाने केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्याच्या घटनेने भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेऊनही बांगलादेशच्या अंतरिम सरकारने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना मानवतावादाविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावत भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. भारत सरकारने मात्र हसीनांना सोपवण्यास नकार दिल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, भारतविरोधी नेता शरीफ उस्मान हादी याच्या हत्येचा आरोप भारतावर लावून पुन्हा एकदा द्वेषाचे राजकारण सुरू झाले आहे. अफवांच्या जोरावर बांगलादेशात पुन्हा एकदा भारतविरोधी निदर्शने पेटली आहेत.

ज्या देशाला भारताने रक्ताचे पाणी करून स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या देशात आज भारताचे नाव शत्रू म्हणून घेतले जाणे ही दक्षिण आशियातील भू-राजकारणासाठी चिंतेची बाब ठरली आहे.

- सुदेश दळवी