अग्निशमन दलाच्या पत्रानुसार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

म्हापसा : श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवाच्या (Shree Bodgeshwar Jatra, Mapusa) ठिकाणी उभारण्यात आलेल्या जायंट व्हीलचा (giant wheel) वापर बंद ठेवण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अग्निसुरक्षेसंबंधित आलेल्या अग्निशमन दलाच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर यांनी जायंट व्हीलचे मालक कादर यांना ही नोटीस बजावून जायंट व्हील बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. श्री बोडगेश्वर जत्रोत्सवात थाटलेल्या जायंट व्हील चालकाने अग्निशमन दलाकडून अग्निसुरक्षेसंदर्भात परवाना घेतलेला नाही, असे पत्र पाठवून दलाच्या मुख्यालयाने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कारवाई करण्याची विनंती केली होती.
या पत्राच्या आधारे शुक्रवारी सायकांळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खोर्जुवेकर यांनी जायंट व्हीलचे ऑपरेशन बंद ठेवण्याबाबतीत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून मामलेदार व म्हापसा पोलिसांना सतर्क राहण्याचा आदेश जारी केला आहे.
नियमांचे सर्रासपणे उल्लंघन
जत्रोत्सवातील फेरीत उभारण्यात येणारी गाळेवजा दुकाने व जायंट व्हीलसारख्या इतर मनोरंजनात्मक खेळांसाठी लागणारे सरकारी यंत्रणांचे आवश्यक परवाने मिळवण्यासाठी देवस्थान समितीकडून एनओसी मिळवणे बंधनकारक असते. मात्र राज्यातील देवस्थानांकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बर्च क्लब दुर्घटनेनंतर अग्निशमन दल तसेच सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.