श्रीकृष्ण परब यांच्याकडे अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) गोवा अध्यक्ष अमित पालेकर (Amit Palekar) यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी राज्याचे संघटन सरचिटणीस श्रीकृष्ण परब (Shri Krishna Parab) यांची अध्यक्षपदी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. संदीप पाठक (Dr. Sandeep Pathak) यांनी बुधवारी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले.
आगामी विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या जि.पं. निवडणुकीत ‘आप’ला अपयश आले. आपने ५० पैकी ४२ जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते, मात्र केवळ एकाच जागेवर पक्षाला विजय मिळवता आला. या निवडणुकीत आपला ५.३५ टक्के मते मिळाली.
२०२० च्या निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी किंचित वाढली असली तरी, आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड या स्थानिक पक्षांनी ‘आप’पेक्षा सरस कामगिरी केली आहे. अपवाद वगळता बहुतेक मतदारसंघात ‘आप’ला मतांचा चार आकडी आकडाही ओलांडता आला नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून पक्षाने पालेकर यांना गोवा संयोजक पदावरून तत्काळ हटवले आहे.
दुसरीकडे, नवनियुक्त तात्पुरते संयोजक श्रीकृष्ण परब हे ‘आरजीपी’चे संस्थापक सदस्य राहिले असून त्यांनी मे २०२५ मध्ये आपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांच्या खांद्यावर आगामी काळात पक्षाची विस्कटलेली घडी बसवण्याची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.
पालेकरांची घसरण
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने अमित पालेकर यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते. मात्र, सांताक्रूझ मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता जिल्हा पंचायत निवडणुकीतील अपयशाचा थेट फटका त्यांच्या पदाला बसला आहे.