अल्लाबक्षला घर खाली करण्याची सुकूर पंचायतीकडून नोटीस

बालिकेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी स्थानिक आक्रमक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15 mins ago
अल्लाबक्षला घर खाली करण्याची सुकूर पंचायतीकडून नोटीस

म्हापसा : बार्देश तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता. या प्रकरणातील संशयित अल्लाबक्ष सय्यदाबादे उर्फ बक्षी (४६) याला अटक झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. संशयिताच्या कुटुंबाला गावात राहण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर, स्थानिक पंचायतीने ‘२० कलमी कार्यक्रम’ परिसरातील या कुटुंबाला बुधवारी सात दिवसांच्या आत घर खाली करण्याची अधिकृत नोटीस बजावली आहे.
मंगळवारी रात्री संशयिताच्या घराबाहेर मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी जमा झाले होते. अशा विकृत मानसिकतेची व्यक्ती किंवा त्याचे कुटुंब आमच्या परिसरात राहणे आमच्या मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे, असा दावा ग्रामस्थांनी केला. तणाव वाढल्याचे पाहून पोलिसांनी मध्यस्थी करत संशयिताच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
वाड्यावर लहान मुले खेळत असतात आणि अनेक पालक कामासाठी घराबाहेर असतात. अशा परिस्थितीत संशयिताचे कुटुंब परिसरात राहिल्यास मुलांच्या जीवाला धोका असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, संशयित आरोपी सध्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीत असून पर्वरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून पंचायतीचे निर्देश
पंचायतीने या नोटिसीत म्हटले आहे की, सदर तक्रार बाल लैंगिक शोषणाच्या गंभीर गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित आहे. ज्यामुळे सामान्य जनतेमध्ये भीती, अशांतता व असुरक्षितता निर्माण झाली आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कुटुंबाला परिसर खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत घर खाली न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.