वास्को पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल

वास्को : वापरात असलेला टू बीएचके फ्लॅट देण्याच्या बहाण्याने २५ लाख ७४ हजार रुपये घेतल्यानंतर ना फ्लॅट दिला, ना रक्कम परत केली, अशी तक्रार नवेवाडे येथील रहिवासी फुर्तादो यांनी वास्को पोलीस स्थानकात दाखल केली आहे. या तक्रारीवरून चिखली येथील रिचर्ड आणि राजेश्वरी यांच्याविरोधात वास्को पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रिचर्ड व राजेश्वरी यांनी ५ डिसेंबर २०२२ ते १४ डिसेंबर २०२३ या कालावधीत फुर्तादो यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण २५ लाख ७४ हजार रुपये घेतले. दाबोळी येथील एका इमारतीतील वापरात असलेला, अनफर्निश्ड टू बीएचके फ्लॅट विक्रीसाठी असल्याचे सांगून ही आगाऊ रक्कम घेण्यात आली होती. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर संशयितांनी संबंधित फ्लॅटचे कोणतेही विक्रीपत्र (सेल डीड) करून दिले नाही. तसेच घेतलेल्या रकमेचा गैरवापर केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने फुर्तादो यांनी आपली रक्कम परत मिळावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला. तथापि, प्रत्यक्ष परतफेड न करता केवळ आश्वासनेच देण्यात आली.
आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर फुर्तादो यांनी अखेर वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मयूर सावंत करीत आहेत.