गोवा : सावर्डे मतदारसंघात बदलाचे ‘संकेत’

जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर चर्चा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th December, 11:52 pm
गोवा : सावर्डे मतदारसंघात बदलाचे ‘संकेत’

पणजी : जिल्हा पंचायतीच्या सावर्डे मतदारसंघात (Sanvordem) अपक्ष उमेदवार आतीश गावकर यांच्या कडव्या लढतीनंतर भाजपच्या (BJP Goa) मोहन गावकर यांना विजय मिळाला असला, तरी मतदारसंघात आता बदलाचे ‘संकेत’ मिळत आहेत. सभापती गणेश गावकर (Ganesh Gaonkar) तसेच माजी आमदार विनय तेंडुलकर (Vinay Tendulkar) यांच्या गावात भाजप उमेदवाराला कमी मते मिळाली आहेत. मात्र भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते संकेत आर्सेकर (Sanket Arsekar) यांच्या कार्यामुळे इतर ठिकाणी भाजपला आघाडी मिळाली. यामुळेच जेमतेम ८६७ मतांनी भाजप उमेदवाराचा विजय सुकर झाला.

धारबांदोडा आणि सावर्डे हे दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ सावर्डे विधानसभा मतदारसंघात येतात. या दोन्ही जिल्हा पंचायती भाजपच्या ताब्यात आणण्यासाठी संकेत आर्सेकर यांनी मोलाचे कार्य केले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या नावाचा विचार करणे भाजप नेतृत्वासाठी अनिवार्य झाले आहे.

सावर्डे मतदारसंघात भाजपचे उमेदवार मोहन गावकर यांना ५,४९३ मते मिळाली, तर अपक्ष आतीश गावकर यांना ४,६२६ मते पडली. परिणामी मोहन गावकर ८६७ मतांनी विजयी झाले. सावर्डे जिल्हा पंचायत मतदारसंघात एकूण २२ मतदान केंद्रे आहेत. मोहन गावकर यांनी १२ केंद्रांवर, तर आतीश गावकर यांनी १० केंद्रांवर आघाडी मिळवली.
आतीश गावकर यांना कष्टी, कळसाय, आनंदवाडी, पोखरण, मावळींगे, कोमोर्णे, धडे, दाबाळ, कोडली आणि बागवाडा येथे आघाडी मिळाली. मोहन गावकर यांनी टोनीनगर, आंबेउदक, किर्लपाल, मिराबाग, गुड्डेमळ, बांदोळ, किणामळ, थोरलेमळ, विश्वंबरवाडी, खुटकरवाडा, कामरकोंड आणि वाघोण येथे आघाडी घेतली.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अपक्ष आतीश गावकर आघाडीवर होते. विशेष म्हणजे गणेश गावकर, विनय तेंडुलकर आणि उमेदवार मोहन गावकर यांच्या किर्लपाल-दाबाळ पंचायतीत देखील भाजपला आघाडी मिळवता आली नाही. तिथे अपक्ष आतीश गावकर यांनी बाजी मारली.

संकेत आर्सेकर यांची भूमिका ठरली महत्त्वाची

संकेत आर्सेकर यांच्या प्रयत्नांमुळे सावर्डे पंचायतीत भाजपला मोठी आघाडी मिळाली. यापूर्वी सावर्डे पंचायत क्षेत्रात भाजपला कधीही आघाडी मिळाली नव्हती. हीच आघाडी भाजपच्या विजयासाठी मुख्य कारण ठरली. धारबांदोडा जिल्हा पंचायत क्षेत्रातही संकेत आर्सेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळेच, जिल्हा पंचायत निकालांनंतर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या बदलाचे ‘संकेत’ प्रबळ झाले आहेत.

हेही वाचा