
म्हापसा (Mapusa) : येथील हुतात्मा चौकामध्ये कारच्या धडकेत (Car accident) जखमी झालेले दुचाकीस्वार रामचंद्र प्रभू साळगावकर (७३, रा. अन्साभाट, म्हापसा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी (Goa Police) कार चालक संशयित देवदत्त मनोहर पाटील (३५, रा. मेरशी व मूळ हेरे चंदगड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
अपघात दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडला होता. अपघातात गंभीर जखमी झालेले प्रभू साळगावकर यांच्यावर गोमेकॉत अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बुधवारी, २४ रोजी पहाटे त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
घटनेच्या दिवशी सकाळी घराकडून रामचंद्र प्रभू साळगावकर हे जीए ०३ ई ००२४ क्रमांकाच्या दुचाकीवरून म्हापसा बाजारपेठेतील आपल्या दुकानावर जात होते. तर, संशयित कार चालक हा एमएच ०४ एफझेड ९१७७ क्रमांकाची कार घेऊन हुतात्मा चौकावरून म्हापशाच्या दिशेने जात होता. यावेळी घटनास्थळी कारची धडक दुचाकीला बसली. त्याबरोबर दुचाकीस्वार प्रभू साळगावकर यांचा दुचाकीवरील तोल जाऊन ते रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथून गोमेकॉत हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर गेले १९ दिवस उपचार सुरू होते.
या प्रकरणी पोलीस हवालदार नीलेश घाडी यांच्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी निष्काळजी व बेदरकारपणे, मानवी धोका निर्माण होईल, अशाप्रकारे योग्य काळजी व खबरदारी न घेता गाडी चालवून निष्पाप दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविना मातोंडकर या करीत आहेत.