राष्ट्रवादाच्या विचारांना पुढे नेण्यासाठी सत्ता आवश्यक : बी. एल. संतोष

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
42 mins ago
राष्ट्रवादाच्या विचारांना पुढे नेण्यासाठी सत्ता आवश्यक : बी. एल. संतोष

पणजी : सत्ता प्राप्त करणे हे भारतीय जनता पक्षाचे ध्येय नक्कीच आहे, मात्र आमच्यासाठी सत्ता ही केवळ उपभोगाची वस्तू नाही. आम्हाला राष्ट्रवादी विचार आणि मूल्ये पुढे नेण्यासाठी सत्ता आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी केले. कदंब पठार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान उपस्थित होते.

बी. एल. संतोष पुढे म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाला आपला विचार पुढे नेण्यासाठी सत्तेची गरज असते. सत्ता असेल तरच पक्षाला आपल्या ध्येयधोरणांची प्रभावी अंमलबजावणी करता येते. सत्तेत असल्यामुळेच आम्हाला 'कलम ३७०' मध्ये बदल करता आला. सत्ता नसती, तर या विरोधात केवळ आंदोलने आणि भाषणे करत बसावे लागले असते. असे असले तरी सत्तेपेक्षा जनतेच्या मनात स्थान निर्माण करणे आणि त्यांचे प्रेम मिळवणे, हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलताना ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमचे प्रेरणास्थान आहे. संस्कार, राष्ट्रवाद आणि नैतिक मूल्यांची प्रेरणा आम्हाला तिथूनच मिळते. माझ्यासाठी ते 'माहेर घर' आहे, असे म्हणता येईल. आम्ही नक्कीच त्यांच्याशी अनेक विषयांवर संवाद साधतो. तसेच विविध हितचिंतकांशीही चर्चा करतो, मात्र निर्णय घेण्याचे आणि पक्ष संघटन चालवण्याचे शंभर टक्के स्वातंत्र्य आमच्याकडेच आहे.

काही वेळा कामात अडथळे आल्यावर मार्ग बदलावा लागतो, मात्र ध्येय एकच असते, असेही त्यांनी नमूद केले. भाजपमध्ये शिस्त आणि सूचनांचे पालन करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाजप हा लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे. नियम जरी केंद्रीय पातळीवर केले जात असले, तरी त्याचे पालन स्थानिक पातळीवर होते, याची आम्हाला जाणीव आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाने 'मंडळ अध्यक्ष ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचा असावा' असा निर्णय घेतला. हा नियम केंद्रीय स्तरावर झाला असला, तरी मंडळ अध्यक्षांची निवड ही स्थानिक पातळीवरच करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा