
मडगाव : राज्यातील विरोधी पक्षांतील आमदारांना जिल्हा पंचायत निवडणूक एकत्र येऊन लढवायची होती; मात्र आम आदमी पक्षाच्या (आप) दिल्लीतील नेत्यांना हे मान्य नव्हते. त्यामुळे 'आप'चे गोव्यातील आमदार नाराज असतील, तर नव्या वर्षात त्यांनी नवे विचार आत्मसात करावेत. गोवा वाचवण्यासाठी विरोधकांच्या एकीसाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व काँग्रेस पक्षाकडून केले जाईल, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले.
मडगाव येथील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना युरी आलेमाव म्हणाले की, निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढवायची असते. त्यामुळे मला वैयक्तिकरीत्या 'मैत्रीपूर्ण लढत' ही संकल्पनाच मान्य नाही. अशा लढतींमुळे मतदारांचा गोंधळ उडतो, परिणामी आगामी निवडणुकांत मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय असू नये.
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करताना त्यांनी सांगितले की, उत्तर गोव्यात जर आम्ही आणखी पाच ते सहा जागा जिंकल्या असत्या, तर दक्षिण गोव्यात जिल्हा पंचायत अध्यक्ष बसवू शकलो असतो. युतीतील चार जागांवर आमचा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव झाला आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या समितीनेही विरोधी पक्षांनी एकत्र लढणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. आता झालेल्या चुकांवर सविस्तर विचारविनिमय केला जाईल. भाजपला सत्तेतून खाली खेचणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे. विधानसभेतही विरोधी पक्ष लोकांचा आवाज बनत असून, यापुढे गोव्याच्या रक्षणासाठी निवडणुकीत ठोस भूमिका घेतली जाईल.
या निवडणुकीतून भाजपविरोधातील जनतेचा राग स्पष्टपणे दिसून आला आहे. भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघांतही लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केले आहे. सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत, भ्रष्टाचार वाढला आहे आणि रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही; म्हणूनच जनतेने मतदानातून हा संदेश दिला आहे, असे आलेमाव यांनी नमूद केले.
भाजपमध्ये कोणालाही बोलण्याची संधी दिली जात नाही, असा आरोप करत त्यांनी सांगितले की, काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. येथे बूथ पातळीवरील कार्यकर्त्यालाही आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. सर्वांची मते जाणून घेऊन पक्षाच्या आणि गोव्याच्या हिताचे निर्णय घेतले जातील. भाजपचा अहंकार, आश्वासनांची पूर्तता न होणे आणि भ्रष्टाचार यामुळे दुखावलेल्या सर्व घटकांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढवू. कोणीही एकट्याने निवडणूक जिंकू शकत नाही, त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.
चर्चेने मतभेद दूर करू विरोधी पक्षनेता म्हणून मी आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस विरोधकांच्या एकजुटीसाठी पूर्ण प्रयत्न करेल. आपापसांतील मतभेद चर्चेने सोडवले जातील. गोव्याच्या हितासाठी युतीची चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत न ताणता ती लवकरच सुरू केली जाईल. राज्यातील ६० टक्के मतदान भाजपविरोधी आहे. त्यामुळे २०२७ मध्ये भाजपला घरी पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होतील. जनता सध्याच्या सरकारला कंटाळली असून, सर्व विरोधक एकत्र आल्यास भाजप दहापेक्षा कमी जागांवर मर्यादित राहील, असा विश्वासही युरी आलेमाव यांनी व्यक्त केला.