विधानसभेत भाजप मगो युतीला ३० जागा निश्चित : दामू नाईक

जागा उतरल्या तरी मतांची टक्केवारी ३९.९३ टक्क्यांवरून ४०.९६ टक्के : पक्षविरोधी कारवायांविषयी अध्यक्षापर्यंत तक्रारी पोचलेल्या नाहीत

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
58 mins ago
विधानसभेत भाजप मगो युतीला ३० जागा निश्चित : दामू नाईक

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत (Zilla Panchayat Election)  भारतीय जनता पक्षाला (BJP) मागच्या निवडणुकीच्या तुलनेत कमी जागा मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी ३९.९३ टक्क्यांवरून ४०.९६ टक्क्यांवर पोचली आहे. सरकारच्या कामांमुळे पक्षाचा जनाधार वाढत असल्याने, येत्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election)  भाजप मगो (BJP-MGP alliance) युतीला ३० जागा निश्चित मिळणार.

मगो पक्ष वा इतर कार्यकर्त्यांविरोधात पक्षविरोधी कारवायांविषयी कुठलीच तक्रार अध्यक्ष या नात्याने आपल्यापर्यंत पोचली नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. जिल्हा पंचायत निवडणूक निकालानंतर भाजपचे संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या मंत्री, आमदारांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत जिल्हा पंचायत निवडणूक निकालाचा आढावा घेण्यात आल्याचे दामू नाईक यांनी सांगितले. 

जिल्हा पंचायतीच्या कामगिरीवर पक्ष समाधानी आहे. सरकारच्या चांगल्या कामांमुळे दोन्ही जिल्हा पंचायतींत पक्षाला विजय मिळाला. पक्षाच्या जागा कमी झाल्या असल्या तरी त्याचा कसलाच परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार नाही. मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी पक्षाला जास्त मते मिळाली आहेत. निकालांचा आढावा झाला असला तरी मंत्री, आमदारांच्या कामाचा आढावा बी. एल. संतोष यांनी घेतलेला नाही.

त्यांनी मंत्री, आमदारांना पुढील वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन केले. सासष्टी तसेच इतर काही ठिकाणी पक्षाने उमेदवार ठेवले नव्हते. त्यामुळे सासष्टीत पराभव होण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपचे उमेदवार नसल्याने कॉंग्रेसला विजय मिळाला, असे ते म्हणाले. मगो पक्षाविषयी कुठल्याच आमदाराची तक्रार आपल्याकडे पोचलेली नाही. पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारी आल्यास त्याची चौकशी होणार, असे दामू नाईक यांनी स्पष्ट केले.  


हेही वाचा