घर रिकामे करण्यासाठी सुकुर पंचायतीने संशयिताच्या कुटुंबाला बजावली सात दिवसांची नोटिस

पणजी : पर्वरी परिसरात सहा वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आणि वाढता जनक्षोभ लक्षात घेता, सुकुर पंचायतीने कठोर पावले उचलली आहेत. संशयिताच्या घराला पंचायतीने टाळे ठोकून ते सील केले आहे. तसेच सार्वजनिक सुरक्षेचे कारण देत संशयिताच्या कुटुंबाला सात दिवसांच्या आत घर रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.
शालेय व्हॅन चालवणारा संशयित चालक अल्लाबक्ष सय्यद याला पर्वरी पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचे पडसाद मंगळवारी स्थानिक परिसरात उमटले. संतप्त नागरिकांनी संशयिताच्या घराला घेराव घातल्याने तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती बिघडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करत घर सील केले. ही कारवाई करण्यापूर्वीच संशयिताची पत्नी आणि १६ वर्षांची मुलगी घर सोडून निघून गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या एका वाहनचालकानेच अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य केल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोषीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनावर दबाव निर्माण केला होता. या कारवाईमुळे परिसरात सध्या शांतता असली तरी, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.