वागातोरमध्ये ‘हॅमरझ मॅकारेना’ नाईट क्लबची एंट्री

बर्च दुर्घटनेनंतरही आस्थापने थाटण्याचा प्रकार सुरूच

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th December, 11:33 pm
वागातोरमध्ये ‘हॅमरझ मॅकारेना’ नाईट क्लबची एंट्री

म्हापसा : हडफडे येथील बर्च क्लब दुर्घटनेनंतर सरकारने नाईट क्लबविषयक धोरण अधिक कडक केले असले, तरीही किनारी भागात नाईट क्लबचे प्रकार सुरूच असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर वागातोर येथे ‘हॅमरझ मॅकारेना’ हा नवा आलिशान नाईट क्लब सुरू झाल्याने हणजूण–कायसूव परिसरातील रहिवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

वझरात, वागातोर येथील टेकडीवर उभारण्यात आलेल्या हॅमरझ मॅकारेना या नाईट क्लबचे बुधवारी (२४ डिसेंबर) नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला उद्घाटन करण्यात आले. बागा–कळंगुट येथे कार्यरत असलेल्या हॅमरझ नाईट क्लबचे हे दुसरे युनिट आहे.

या नाईट क्लब कंपनीचे चार मालक असून त्यापैकी तिघे परप्रांतीय तर एक गोमंतकीय आहे. यातील सहमालक यतीन शर्मा ऊर्फ आशुतोष पंडित याला नुकतेच सीबीआयने अटक केली आहे. शर्मा हा गेल्या १२ वर्षांपासून १७ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात फरार होता. तो गोव्यात बनावट नावाने व्यवसाय करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

बर्च दुर्घटनेनंतर प्रशासन जागे

साकवाडी–हडफडे येथे ६ डिसेंबर रोजी बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर सरकार व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. राज्य सरकारने संयुक्त अंमलबजावणी देखरेख समिती स्थापन करून राज्यातील नाईट क्लब व रेस्टॉरंटची तपासणी सुरू केली.

विशेषतः अग्निसुरक्षा परवाने व अग्निशमन दलाची मान्यता नसलेल्या आस्थापनांवर कारवाई करत त्यांना सील करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. सरकारने नाईट क्लबविषयक धोरण कडक केल्यानंतरही हा नवा पॉश नाईट क्लब सुरू झाल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

ध्वनी प्रदूषणाचा वाढता त्रास

हणजूण–वागातोर हा किनारी पट्टा यापूर्वीही ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर चर्चेत राहिला आहे. या भागात सुमारे २० पेक्षा अधिक रेस्टॉरंट व नाईट क्लब रात्रीपासून पहाटेपर्यंत मोठ्या आवाजात संगीत कार्यक्रम आयोजित करतात. यामुळे स्थानिक रहिवाशांची झोपमोड होते. तसेच शांततेचा अनुभव घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

‘हॅमरझ मॅकारेना’ नाईट क्लबचे लोकार्पण

बुधवारी रात्री ९ वाजता हॅमरझ मॅकारेना नाईट क्लबचे लोकार्पण करण्यात आले. क्लबची लाँचिंग थीम ‘डार्क ऑबसेशन’ अशी आहे. हा लोकार्पण सोहळा २४ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान चालणार आहे. या कालावधीत देशातील नामांकित १२ डीजेचे शो आयोजित करण्यात आले आहेत.

लोकार्पण आधी पुढे ढकलले

हॅमरझ मॅकारेना या नाईट क्लबचे लोकार्पण १२ डिसेंबर रोजी होणार होते. मात्र, बर्च दुर्घटनेनंतर सरकारने नियम कडक केल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. दुर्घटनेनंतर अंमलबजावणी देखरेख समितीने या बांधकाम सुरू असलेल्या नाईट क्लबची पाहणी देखील केली होती.

हेही वाचा