मनोज परब यांनी मागितली माफी : ‘आपण एकत्र आहोत’चा आता संदेश

पणजी : विरोधी मतांच्या विभाजनामुळे राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला विजय मिळाला, अशी कबुली देत आता सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान, निकालानंतर ‘आरजी’चे प्रमुख मनोज परब यांनी काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. निवडणुकीपूर्वी युती तुटल्यामुळे निर्माण झालेल्या रागातून आपल्याकडून चुकीची वक्तव्ये झाली, असे परब यांनी स्पष्ट केले.
मतांचे गणित आणि भाजपचा फायदा
सोमवारी जाहीर झालेल्या निकालात भाजप-मगो युतीला ३२ जागा, काँग्रेसला १०, आरजीला २, गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’ला प्रत्येकी १ तर ४ अपक्ष उमेदवारांना विजय मिळाला. अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार कमी फरकाने जिंकले. विरोधी मतांची विभागणी झाल्याचा थेट फायदा सत्ताधारी पक्षाला झाल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले असून, हा मोठा धडा मिळाल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
मनोज परब यांचा माफीनामा
निवडणुकीपूर्वी आरजीसोबतची चर्चा फिसकटल्याने युती तुटली होती. त्यानंतर आरजी प्रमुख मनोज परब यांनी काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली होती. "युती तुटल्यामुळे निर्माण झालेल्या रागातून माझ्याकडून चुकीची वक्तव्ये झाली. त्याबद्दल मी माणिकराव ठाकरे यांची जाहीरपणे माफी मागतो," असे मनोज परब यांनी स्पष्ट केले. या माफीनाम्यामुळे विरोधकांमधील संवादाचे दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता आहे.
निर्णय घेण्यास उशीर झाला : सरदेसाई
यावर प्रतिक्रिया देताना गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले, "मागील लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र आल्याने भाजपचा पराभव झाला होता. यावेळी निर्णय उशिरा झाला. ‘आपण एकत्र आहोत’ हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचायला हवा होता. पुढे विरोधकांनी एकत्र यावे आणि जागावाटप वेळेवर करावे. शेवटच्या क्षणापर्यंत थांबल्यास नुकसान होते, हे या निकालाने दाखवून दिले आहे."
धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळणे गरजेचे
युती झाली असती तर काँग्रेसला नक्कीच विजय मिळाला असता. अनेक मतदारसंघांत मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला. यापुढील काळात युतीबाबतचे निर्णय वेळेवर व्हायला हवेत आणि त्यासाठी तडजोड करण्याची तयारी ठेवावी लागेल. काँग्रेस पक्ष या निकालाचा अभ्यास करेल, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले.