काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर : आरजीपीची लक्षवेधी कामगिरी

पणजी : यंदाच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत एकूण ६ लाख १५ हजार ५८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक मते मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. मतांच्या टक्केवारीत भाजपनंतर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर ‘आरजीपी’ने तिसऱ्या क्रमांकाची मते घेत लक्षवेधी कामगिरी केली.
मतांच्या टक्केवारीत भाजप अव्वल
या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक २ लाख ५० हजार १४९ मते मिळवली. हे प्रमाण एकूण मतदानाच्या ४०.६३ टक्के इतके आहे. त्याखालोखाल काँग्रेसने १ लाख १६ हजार ५६५ मते (१८.९३ टक्के) घेतली. प्रथमच जिल्हा पंचायत निवडणूक लढवणाऱ्या ‘आरजीपी’ने चांगली कामगिरी करत ५६ हजार ३३१ मते (९.१५ टक्के) मिळवली. विशेष म्हणजे, अपक्ष उमेदवारांनी मिळून १ लाख ३ हजार ९६३ मते (१६.८८ टक्के) घेतली आहेत.
जागांच्या गणितातही भाजप सरस
जागांच्या बाबतीतही भाजपने बाजी मारली आहे. भाजपने ४० उमेदवार उभे केले होते, त्यापैकी २९ उमेदवार विजयी झाले. भाजपसोबत युतीत असलेल्या ‘मगो’चे तिन्ही उमेदवार निवडून आले. काँग्रेसने ३६ उमेदवार उभे केले होते, त्यापैकी १० जागांवर त्यांना यश आले. ‘आप’ने सर्वाधिक ४२ ठिकाणी उमेदवार दिले होते, मात्र त्यांचा केवळ एकच उमेदवार निवडून आला.
पक्षनिहाय मते आणि जागांचे विवरण
| पक्ष | मिळालेली मते | टक्केवारी (%) | विजयी जागा |
|---|---|---|---|
| भाजप | २,५०,१४९ | ४०.६३ % | २९ |
| काँग्रेस | १,१६,५६५ | १८.९३ % | १० |
| अपक्ष | १,०३,९६३ | १६.८८ % | ०४ |
| आरजीपी | ५६,३३१ | ९.१५ % | ०२ |
| आम आदमी पक्ष | ३२,९९५ | ५.३५ % | ०१ |
| गोवा फॉरवर्ड | ३०,५७३ | ४.९६ % | ०१ |
| मगो | २३,६४६ | ३.८४ % | ०३ |
| राष्ट्रवादी (SP) | १,३५९ | ०.२२ % | ०० |