सिद्धार्थ गावस देसाईंची दक्षिण जिल्हा पंचायत अध्यक्षपदी वर्णी शक्य

पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक निकालानंतर आता उत्तर आणि दक्षिण गोव्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपद महिलांसाठी, तर दक्षिण गोव्याचे उपाध्यक्षपद महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. या आरक्षणामुळे काही दिग्गज सदस्यांची अध्यक्षपदाची संधी हुकली आहे.
उत्तर गोवा : अध्यक्षपदासाठी दोघींमध्ये चुरस
निकाल पाहता दोन्ही ठिकाणी भाजप-मगो युतीची सत्ता येणार आहे. उत्तर गोव्यात युतीच्या ५ महिला सदस्य निवडून आल्या आहेत. यात फ्रांझिलिया मिनेझिस (कळंगुट), रेश्मा बांदोडकर (रेईश-मागूश), गौरी कामत (चिंबल), कुंदा मांद्रेकर (मये) आणि तारा हडफडकर (मगो-मोरजी) यांचा समावेश आहे. सूत्रांनुसार, अध्यक्षपदासाठी रेश्मा संदीप बांदोडकर आणि गौरी प्रमोद कामत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तसेच उपाध्यक्षपदासाठी दोनदा निवडून आलेले सिद्धेश नाईक (खोर्ली) आणि महेश सावंत (कारापूर-सर्वण) यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.
दक्षिण गोवा : अध्यक्षपदी सिद्धार्थ देसाई?
दक्षिण गोव्यातून भाजपच्या ५ आणि मगोची १ अशा एकूण ६ महिला सदस्य निवडून आल्या आहेत. मात्र, येथे अध्यक्षपद खुले असल्याने शेल्डे मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले सिद्धार्थ गावस देसाई यांची दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
युतीचा धर्म पाळल्यास मगोला संधी
दक्षिण गोव्याचे उपाध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. भाजपने युतीचा धर्म पाळत हे पद मगोला देण्याचा निर्णय घेतल्यास, प्रियोळ मतदारसंघातील विजयी उमेदवार आदिती गावडे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडू शकते. अन्यथा भाजपच्या समीक्षा नाईक, पूनम सामंत, गौरी शिरोडकर, राजश्री गावकर किंवा अंजली वेळीप यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.