अमली पदार्थांचा विळखा सोडवण्यासाठी सामूहिक लढ्याची गरज

सरन्यायाधीश सूर्य कांत : पर्वरी येथे जागृती मोहिमेचा शुभारंभ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th December, 10:12 pm
अमली पदार्थांचा विळखा सोडवण्यासाठी सामूहिक लढ्याची गरज

पणजी : अमली पदार्थांविरोधात लढा देणे ही केवळ एखाद्या एकाच संस्थेची जबाबदारी नसून ती सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. अमली पदार्थांची सुरुवात अनेकदा कुतूहलातून होते; मात्र त्याचे दुष्परिणाम कुटुंब, शिक्षण व्यवस्था आणि संपूर्ण समाजावर होतात, असे प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले.

तरुणाई आणि देशाचे भवितव्य

पर्वरी येथील उच्च न्यायालयाच्या इमारतीत अमली पदार्थांविरोधात जागृती मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचे भवितव्य तरुणांवर अवलंबून असल्याने त्यांनी अमली पदार्थांच्या व्यवहारापासून आणि सेवनापासून दूर राहणे आवश्यक आहे. या व्यसनामुळे केवळ व्यक्तीच नव्हे, तर कुटुंब, समाज आणि शिक्षण व्यवस्थाही उद्ध्वस्त होते, असे त्यांनी सांगितले.

पोलिस आणि केंद्रीय संस्थांचे सहकार्य

अमली पदार्थांच्या रॅकेट्स उद्ध्वस्त करण्यासाठी गोवा पोलीस केंद्रीय तपास संस्थांचे सहकार्य घेत आहेत. अमली पदार्थांचे सेवन थांबवण्यासाठी शाळांसह विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी नमूद केले.

कुतूहल पडते महागात!

एकदा अमली पदार्थांचे सेवन सुरू झाले की, त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण ठरते. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था तसेच इतर घटकांनी सर्व भागांत व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन सरन्यायाधीशांनी केले.

महिनाभर चालणार मोहीम

गोवा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमली पदार्थांविरोधातील ही जागृती मोहीम एक महिना चालणार आहे. यावेळी विशेष ‘एसओपी’चे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती महेश सोनक उपस्थित होते.

सरकारचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण

अमली पदार्थांमुळे कुटुंबासह संपूर्ण समाज उद्ध्वस्त होण्याची भीती असते. तरुण हे गोव्याचे भविष्य असल्याने अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ हे सरकारचे धोरण आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

#AntiDrugCampaign #GoaNews #CJISuryaKant #CMPramodSawant #ZeroTolerance