रिझर्व्ह बँकेचा अहवाल प्रसिद्ध : दहा वर्षांत तब्बल १०८ टक्क्यांनी वाढली संख्या

पणजी : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर गोव्यातील पर्यटक कमी झाल्याचा दावा करत असले तरी वास्तव वेगळे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, मागील दहा वर्षांत गोव्यात येणाऱ्या देशी पर्यटकांच्या संख्येत तब्बल १०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१५ च्या तुलनेत २०२४ मध्ये ही संख्या दुपटीहून अधिक वाढली.
अहवालानुसार २०१५ नंतर २०२० आणि २०२१ हा कोरोनाचा कालावधी वगळता देशी पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतच गेली. २०१६ मध्ये ५६.५ लाख, २०१७ मध्ये ६९ लाख, २०१८ मध्ये ७०.८ लाख, तर २०१९ मध्ये ७१.३ लाख देशी पर्यटकांनी राज्याला भेट दिली. २०२० मध्ये ही संख्या ३२.६ लाखांवर आली, तर २०२१ मध्ये ती ३३.१ लाख इतकी नोंदवली गेली.
कोरोना संपल्यावर राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली. २०२२ मध्ये ७०.१ लाख, तर २०२३ मध्ये ८१.८ लाख पर्यटक आले. २०२४ मध्ये ही संख्या ९९.४ लाखांवर पोहोचली. मागील १४ वर्षांतील ही सर्वाधिक संख्या ठरली.
२०२४ मध्ये उत्तर प्रदेशला सर्वाधिक ६४.६८ कोटी देशी पर्यटकांनी भेट दिली. त्याखालोखाल तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत पर्यटकांची वर्दळ अधिक होती. त्यामानाने ईशान्येकडील राज्यांमध्ये देशी पर्यटक जाण्याचे प्रमाण कमी राहिले.
२०२४ मध्ये आलेल्या ९९.४ लाख पर्यटकांच्या संख्येवरून सरासरी काढली असता, महिन्याला सुमारे ८.२८ लाख पर्यटक आले. म्हणजेच दिवसाला सरासरी २७ हजार २३२ देशी पर्यटकांनी गोव्याला पसंती दिली, अशी माहिती अहवालातून समोर आली.
| वर्ष | पर्यटक संख्या (लाखांत) |
|---|---|
| २०१५ | ४७.८ |
| २०१६ | ५६.५ |
| २०१७ | ६९.० |
| २०१८ | ७०.८ |
| २०१९ | ७१.३ |
| २०२० (कोरोना) | ३२.६ |
| २०२१ (कोरोना) | ३३.१ |
| २०२२ | ७०.१ |
| २०२३ | ८१.८ |
| २०२४ | ९९.४ (सर्वाधिक) |
| एकूण देशी पर्यटक | ९९.४ लाख |
| महिन्याला सरासरी | ८.२८ लाख |
| आठवड्याला सरासरी | सुमारे १.९१ लाख |
| दररोज सरासरी | २७,२३२ |