बेतीमध्ये वीर बाल दिवस साजरा

पणजी : शीख (Shikh) समाजाने भारतासाठी (India) खूप मोठे योगदान दिले आहे. गुरु गोविंद सिंग यांच्या मृत्यूनंतर दोन्ही लहान मुलांनी धर्मासाठी बलिदान दिले होते. याची आठवण ठेवण्यासाठी वीर बाल दिवस साजरा करण्यात येत असल्याचे भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांनी बेती येथील गुरूद्वाराची भेट देऊन शहीदांना नमन केले. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आमदार केदार नाईक आणि गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दामू नाईक म्हणाले की, गुरू गोविंद सिंग यांच्यानंतर त्यांची मुले साहिबजादे जोरावर आणि फतेह सिंग यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. दोघांनाही जिवंतपणे भिंतीत गाडण्यात आले होते. असे असले तरी त्या दोघांनी बलिदान देत धर्माप्रती निष्ठा ठेवली. राष्ट्रप्रेम, धर्मनिष्ठेची ही शिकवण आजच्या पिढीला मिळावी, त्यांची आठवण कायम रहावी, यातून प्रेरणा मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वीर बाल दिवस सुरू करण्याची संकल्पना मांडली होती.
ते म्हणाले, भाजप सरकारने शीख समाजासाठी फतेहपूर येथील गुरुद्वाराचे दरवाजे उघडले. करतारपूर येथे जाण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शीख समुदाय लंगर करून समाजाची सेवा करतो. यासाठी या लंगरातील सामान जीएसटी मुक्त करण्यात आले होते. शीख समाजाने दिलेल्या योगदानाचा इतिहास शालेय तसेच महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात घालण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीने शीख समाजाने तसेच जोरावर आणि फतेह सिंग यांनी केलेल्या कामगिरीची माहिती घेणे आवश्यक आहे.