
म्हापसा : गोव्यातील (Goa) पर्वरी येथे कोल्ड्रींक (Cold Drink) घेण्याचा बहाणा करीत ‘जनरल स्टोअर’ (General Store) दुकानाच्या वृद्ध मालकिणीच्या गळ्यातील सोनसाखळी (Gold Chain) चोरट्यांनी हातोहात हिसकावून नेली. ही घटना नाताळाच्या (Christmas) दिवशी गुरुवारी २५ रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास पर्वरी (Porvorim) येथील पीडीए कॉलनीमध्ये घडली.
फिर्यादी मेधा आगशीकर ही दुकानात बसली होती. संशयित चोरटा स्कूटरवरून कॉलनीमध्ये आला. महिला दुकानात एकटीच असल्याचे पाहून संशयितांनी स्कूटर दुकानाजवळ आणली. त्यातील एकटा दुकानात गेला. त्याने कोल्ड्रिंक मागितली, जेव्हा दुकानदार महिला कोल्ड्रिंक आणायला खुर्चीवरून उठली, तेव्हा संशयिताने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. सोनसाखळी तुटून संशयिताच्या हाती आली. तर फिर्यादी महिला जमिनीवर कोसळली. सोनसाखळी हाती लागताच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच साळगाव तसेच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संशयित चोरट्यांचा सर्वत्र शोध घेतला. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु उड्डाण पुलाच्या कामामुळे राष्ट्रीय महामार्गावरील कॅमेरे काढले असल्याने चोरटे कोणत्या बाजूने गेले हे समजू शकलेले नाही. याप्रकरणी साळगाव पोलिसांनी अज्ञात दोघाही चोरांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.