‘लव्ह जिहाद विरोधा’तील जागृतीला आमचा पाठिंबा ! : सुभाष फळदेसाई, समाजकल्याणमंत्री

गोव्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करण्याची ‘रणरागिणी’ची मागणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
40 mins ago
‘लव्ह जिहाद विरोधा’तील जागृतीला आमचा पाठिंबा ! : सुभाष फळदेसाई, समाजकल्याणमंत्री

पणजी :  ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) हा अत्यंत विकृत प्रकार देशाबरोबरच आता गोव्यातही हळूहळू रूजू लागला आहे. आमचा कुठल्याही धर्माविषयी आकस नाही, तर प्रत्येकाने स्वत:च्या धर्माविषयी आदर ठेवला पाहिजे. याला कोणाचाही विरोध नाही; परंतु दुसर्‍या धर्माच्या विरोधात कटकारस्थान करून नियोजनपूर्वक दुसर्‍या धर्माच्या मुलींना फसवून त्यांचा छळ करून खून करणे हा प्रकार जाणीवपूर्वक होत असल्यास आम्ही त्याचा निषेध करतो. असे प्रकार गोव्यात होऊ नये; यासाठी जागृतीपर उपक्रमाला आमचा पाठिंबा आहे, असे विधान गोव्याचे (Goa) समाजकल्याणमंत्री (Social Welfare Minister) सुभाष फळदेसाई (Subhash Phal Dessai) यांनी केले आहे.

गोव्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधी तत्काळ कायदा करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची ‘रणरागिणी’ शाखा राज्यातील मंत्रीगण आणि आमदार यांना भेटून करत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या वतीने निवेदन दिल्यानंतर मंत्री सुभाष फळदेसाई यांनी हे विधान केले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘रणरागिणी’च्या सौ. शैला देसाई, सुभाष खराडे, लक्ष्मण केरकर आणि गोविंद लोलयेकर यांची उपस्थिती होती.

हिंदु जनजागृती समितीने गोव्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करण्याची मागणी करणारे निवेदन यापूर्वी क्रीडामंत्री रमेश तवडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांना दिले आहे. या प्रकरणी इतर मंत्री आणि आमदार यांच्याही भेटीगाठी चालू आहेत.

हिंदु जनजागृती समितीने या निवेदनात गोव्यात घडलेल्या विविध ‘लव्ह जिहाद’ घटनांचा उल्लेख केला असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या निवेदनामध्ये साक्षी, अनुराधा, श्रद्धा यांसह अन्य हिंदू मुलींची हत्या करणार्‍या लव्ह जिहादींना तत्काळ फासावर लटकवणे, राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना याची चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती नेमणे,  ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला असल्याचे हिंदु जनजागृती समितीतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

हेही वाचा