
मडगाव : (Goa) फातोर्डा (Fatorda) येथील मिंगेल मिरांडा (६२) व त्यांची सासू कॅटारिना पिंटो (८५) यांचा २०२१ मध्ये खून (Murder) करण्यात आला होता. याप्रकरणी दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित रविनकुमार श्यामकुमार सडा (२२) व आकाश अजयकुमार घोष (२४) या दोघांनाही खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप व ५० हजारांचा दंड सुनावल.
फातोर्डा येथे ७ मार्च, २०२१ रोजी कामगार ठेकेदार असलेल्या मिंगेल मिरांडा व त्यांच्या सासू कॅटारिना पिंटो यांचे मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले होते. फातोर्डा पोलिसांनी याप्रकरणात तीन कामगारांना मुंबई येथून ताब्यात घेतले होते. यातील संशयित रविनकुमार श्यामकुमार सडा (२२, मूळ बिहार) व आकाश अजयकुमार घोष (२४, रा. मूळ झारखंड) हे एका अल्पवयीन साथीदारासह कामगार ठेकेदार असलेल्या मिरांडा यांच्याच भाड्याच्या खोलीत राहत होते.
मिंगेल मिरांडा व कामगार यांच्यात देण्यात येणाऱ्या मजुरीच्या पैशांवरुन वाद होत होते. याच रागातून कामगारांनी दोघांचेही खून केले. या सुनावणीवेळी न्यायालयात २४ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. अल्पवयीन संशयिताचा खटला बालन्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. रविनकुमार सडा व आकाश घोष या दोन्ही संशयितांना न्यायालयाने खुनाच्या कलमाखाली दोषी ठरवले होते. याप्रकरणी सुनावणीवेळी संशयितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय ५० हजारांचा दंड ही ठोठावला आहे.