पक्षाला,पालकांना शिव्या घातलेल्या व्यक्तीबरोबर राहणार नाही : सुदिन ढवळीकर

गोविंद गावडे वादावर सुदिन ढवळीकर यांची प्रतिक्रिया

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
29 mins ago
पक्षाला,पालकांना शिव्या घातलेल्या व्यक्तीबरोबर राहणार नाही : सुदिन ढवळीकर

पणजी : मगो (MG Party) कार्यकर्त्यांनी जर गोविंद गावडे (Govind Gaude) यांच्या विरोधात काम केलेले असेल तर त्यात आमचा वाटा कसलाच नाही. पण ज्या माणसाने आमच्या पक्षाला, पालकांना अपशब्द वापरले त्या माणसाबरोबर आम्ही कसेच राहणार नसल्याचे भाजपच्या श्रेष्ठीला सांगितले असल्याचे मगोचे आमदार (MLA) तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar)  यांनी सांगितले. 

झेडपी निवडणुकीत वेलींग प्रियोळ मतदारसंघात मगो पक्षाने भाजपच्या उमेदवाराविरुद्ध काम केल्याची तक्रार गोविंद गावडे यांनी भाजपचे गोवा प्रभारी तथा महामंत्री बी. एस. संतोष यांच्याकडे केली होती. 

 या विषयी प्रतिक्रिया देताना ढवळीकर बोलत होते. निवडणूक होण्याआधी भाजपचे जे श्रेष्ठी आहेत; त्यांना वेलींग प्रियोळ मतदारसंघ मगो पक्षाला देण्याची मागणी केली होती. पण न दिल्याने आमचे कार्यकर्ते त्यांचा सोब राहण्यास तयार नव्हते, असे स्पष्टीकर ढवळीकर यांनी दिले. 

आमची या मतदारसंघात युती आहे; या मतदारसंघात उभे राहू नका; असे आम्ही सांगितले होते. जर ते राहिले असतील तर तो आमचा भाग नाही. तसेच युती करण्याच्या वेळी आम्ही तसेच कार्यकर्त्यांनी सांगितले होते की, जी व्यक्ती आमच्या सिंहाला शिव्या देते तो आम्हाला लागत नाही, असे ढवळीकर यांनी सांगितले. 

आमची निशाणी सिंह ही आमची देवी नवदुर्गा आणि महालक्ष्मी देवीचे वाहन आहे. त्या सिंहाला या माणसाने अपशब्द वापरले आहेत. त्या शिवाय आमच्या आईवडिलांना त्यांनी अपशब्द वापरले आहेत. त्यासाठी अशा व्यक्तीबरोबर कधीच राहणार नाही आणि यापुढे राहणार नसल्याचे ज्या कुणाला सांगायचे आहे; त्यांना स्पष्ट सांगितले असल्याचे ढवळीकर म्हणाले. 

हेही वाचा