गाईच्या पोटातून काढला तब्बल ४८ किलो प्लास्टिकचा कचरा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
गाईच्या पोटातून काढला तब्बल ४८ किलो प्लास्टिकचा कचरा

वाळपई : पिसुर्ले येथील एका भटक्या गाईच्या पोटामधून सुमारे ४८ किलो प्लास्टिकचा कचरा बाहेर करण्यात आला. गाईवर शस्त्रक्रिया वाळपई येथील गोशाळेमध्ये करण्यात आली. एका बाजूने प्लास्टिक हटाव, स्वच्छतेचा मंत्र, स्वच्छतेचे अभियान प्रत्येक पंचायतीकडून राबविण्यात येत आहे. मात्र, अशाप्रकारे प्लास्टिकचा कचरा खाऊन गुरे आजारी पडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.

पिसुर्ले येथील एक गाय आजारी पडली. या संदर्भात माहिती वाळपई गोशाळेला प्राप्त झाल्यानंतर तिला गोशाळेमध्ये आणण्यात आले. तिच्यावर उपचार करत असताना तिच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा असल्याचे निदर्शनास झाले. गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यात आली तिच्या पोटातून सुमारे ४८ किलो प्लास्टिकचा कचरा बाहेर काढण्यात आला.

गोशाळेचे पशुवैद्यकीय अधिकारी रघुनाथ धुरी यांनी सांगितले की, सुमारे ४८ किलो प्लास्टिकचा कचरा गाईच्या पोटातून बाहेर काढण्यात आला आहे. प्लास्टिकच्या पाईपचे तुकडे, लोखंडी काम करण्यासाठी वापरण्यात येणारी बिल्डिंग वायर, प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या आहेत. यामुळे सदर गाईची प्रकृती अत्यंत गंभीर होती. शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर गाईची प्रकृती सुधारली आहे.

ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अमेय कुट्टीकर व दिनेश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

सत्तरी तालुक्यात प्रत्येक पंचायत क्षेत्रामध्ये स्वच्छता व प्लास्टिक याविषयी जागृती करण्यात येत असते. त्याचप्रमाणे विद्यालयाकडून सुद्धा या संदर्भात जनजागृती करण्यात येत असते. तरीसुद्धा अशाप्रकारे प्लास्टिकचा कचरा आढळून येत असल्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून येणाऱ्या काळात प्लास्टिकच्या कचऱ्याच्या माध्यमातून प्रदूषणाचा विळखा आणखीन घट्ट होणार असल्याचे दिसते. 

हेही वाचा