महिला मतदारांची टक्केवारी ५१.९६

पणजी : यंदाच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत (ZP election Goa) विक्रमी ७१ टक्के मतदान झाले. २०१५ आणि २०२० च्या तुलनेत यंदा मतदानाची (voting) टक्केवारी वाढली आहे. तसेच २०१५ आणि २०२० च्या तुलनेत यंदा महिला मतदारांच्या (women voters Goa) मतदान टक्केवारीत देखील वाढ झाली आहे. २०१५ मध्ये एकूण मतदारांपैकी ५१.५७ टक्के, तर २०२० मध्ये ४९.३३ टक्के महिला होत्या. २०२५ मध्ये महिला मतदारांची टक्केवारी वाढून ५१.९६ टक्के झाली.
२०१५ मध्ये एकूण ५ लाख १८ हजार ५१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये २ लाख ५१ हजार १०६ पुरुष (४८.४२ टक्के), तर २ लाख ६७ हजार ४१३ महिला होत्या. २०२० च्या निवडणुकीत कोविड मुळे एकूण मतदानाची टक्केवारी कमी होऊन ५६.८६ टक्के झाली होती. त्या निवडणुकीत एकूण ४ लाख ५० हजार २३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये २ लाख २८ हजार ११७ पुरुष (५०.६६ टक्के), तर २ लाख २२ हजार ११९ महिला होत्या.
यावेळी एकूण ६ लाख १६ हजार ४१८ मतदारांनी मतदान केले. यातील २ लाख ९६ हजार ६५ पुरुष (४८.०२ टक्के), तर ३ लाख २० हजार ३५१ महिला मतदार होत्या. या निवडणुकीत नावेली मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या १,३९५ ने अधिक होती. रिवण, शेल्डे, सांताक्रूझ येथेही महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा ८०० हून अधिक होती. रईशमागूश, धारगळ, हणजूण येथे महिलांपेक्षा पुरुष मतदारांची संख्या अधिक होती.
दोन तृतीयपंथीय मतदार
जिल्हा पंचायत निवडणूक २०२५ मध्ये पाच तृतीयपंथीयांनी मतदार म्हणून नोंदणी केली होती. यातील २ व्यक्तींनी मतदानाचा अधिकार बजावला. २०१५ आणि २०२०च्या निवडणुकीत मतदार यादीत तृतीयपंथीय उमेदवारांची नोंदणी नव्हती.