गोव्याची हिमाचलवर ८ धावांनी मात

ललित यादवचे शतक : दीपराज गावकरचे पाच बळी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
53 mins ago
गोव्याची हिमाचलवर ८ धावांनी मात

पणजी : विजय हजारे ट्रॉफी एलिट क्रिकेट स्पर्धेत गोव्याने शुक्रवारी अटीतटीच्या लढतीत हिमाचल प्रदेशचा ८ धावांनी पराभव करत आपल्या सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. जयपूर येथील जयपुरिया विद्यालयाच्या मैदानावर हा सामना झाला. कर्णधार दीपराज गावकरची अष्टपैलू कामगिरी, ललित यादवचे शतक तसेच सुयश प्रभुदेसाईच्या अर्धशतकाच्या बळावर गोव्याने हा विजय साकार केला.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना हिमाचलला इनेश महाजन व कलसी या जोडीने ५८ धावांची सलामी दिली. यानंतर गोव्याने काही चेंडूंंतच त्यांची ३ बाद ६० अशी नाजुक स्थिती केली. यातच त्यांचा कर्णधार सुरोच बाद झाल्याने त्यांचा संघ ४ बाद ७० असा अधिक संकटात सापडला. एका टोकाने गडी बाद होत असताना चौथ्या स्थानावरील पुखराज मान याने किल्ला लढवताना ११९ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १२६ धावा करताना लहान-मोठ्या भागीदार्‍यांसह गोवा संघाला दबावाखाली ठेवले. डावातील ४६व्या षटकात दीपराजने त्याचा बळी मिळवत डावात पाच बळी घेण्याची अद्वितीय कामगिरी केली. शेपटाने थोडाफार प्रतिकार करूनही हिमाचलचा संघ विजयापासून दूर राहिला. तत्पूर्वी, गोव्याने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २८५ धावा करताना हिमाचलला ४९.३ षटकांत २७७ धावांत रोखले.
हिमाचल प्रदेशने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. गोव्याचे आघाडी फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्याने गोव्याची ९.३ षटकांत ३ बाद ३३ अशी स्थिती झाली होती. सुयश प्रभुदेसाई व ललित यादव यांनी या स्थितीतून गोव्याचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९० धावा जोडल्या. सुयशने ६३ चेंडूंत ५ चौकारांसह ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सुयश बाद झाल्यानंतर सहाव्या स्थानावर दर्शन मिसाळ फलंदाजीस आला. परंतु त्याच्या अपयशामुळे गोव्याचा संघ ३२.४ षटकांत ५ बाद १५० असा अडचणीत सापडला. सातव्या स्थानावर उतरलेला कर्णधार दीपराज गावकरने आक्रमक खेळ करत हिमाचलच्या गोलंदाजांना लक्ष्य केले. केवळ ४८ चेंडूंचा सामना करताना त्याने ६ चौकार व २ षटकारांसह आपल्या ७१ धावांच्या खेळीला त्याने बळ दिले. दुसर्‍या टोकाने ललित यादवने आपले शतक पूर्ण केले. १२६ चेंडूंत १०४ धावांची समायेचित खेळी त्याने ५ चौकारांसह सजवली. ललित बाद झाल्यानंतर राजशेखर हरिकांतने १० चेंडूंत नाबाद 16 धावा करत गोव्याची धावगती वाढवली. गोव्याने डावातील शेवटच्या षटकात दीपराज, राजशेखर व कौशिक असे तीन गडी गमावले. गोव्याचा पुढील सामना २९ रोजी सिक्कीमशी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
गोवा : ५० षटकांत ९ बाद २८५ (स्नेहल कवठणकर ११, कश्यप बखले ४, अभिनव तेजराणा ४, सुयश प्रभुदेसाई ५१, ललित यादव १०४, दर्शन मिसाळ १३, दीपराज गावकर ७१, राजशेखर हरिकांत १६, अर्जुन तेंडुलकर नाबाद १, व्ही कौशिक ३, अवांतर ७, रोहित कुमार ५५-५, मृदुल सुरोच ५०-२) विजयी वि. हिमाचल प्रदेश : ४९.३ षटकांत सर्वबाद २७७ (इनेश महाजन २१, अंकित कलसी ३४, ई.सी.सेन ०, पुखराज मान १२६, मृदुल सुरोच ६, अमनप्रीत सिंग ९, एन.ए. शर्मा ३१, ए.पी. वशिष्ठ १५, रोहित कुमार १५, वैभव अरोरा नाबाद ७, आर्यमान धालिवाल ५, अवांतर ८, दीपराज गावकर ५०-५ कौशिक व्ही. ३४-२, शुभम देसाई ४७-१, दर्शन मिसाळ ४१-१)