एफसी गोवा, एफसी इस्तिकलोल आज आमनेसामने

एसीएल-२ : फातोर्डा मैदानात शेवटच्या आशियाई लढतीसाठी भिडणार

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd December, 11:50 pm
एफसी गोवा, एफसी इस्तिकलोल आज आमनेसामने

फातोर्डा : एएफसी चॅम्पियन्स लीग टू (एसीएल-२) मधील आपल्या शेवटच्या ग्रुप-डी सामन्यासाठी एफसी गोवा संघ पुन्हा एकदा फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उतरणार आहे. बुधवारी होणाऱ्या या लढतीत त्यांचा सामना ताजिकिस्तानच्या एफसी इस्तिकलोल संघाशी होणार आहे. बाद फेरीची संधी हुकली असली तरी, घरच्या मैदानावर विजयाची नोंद करून सन्मानाने या आशियाई मोहिमेचा निरोप घेण्याचा निर्धार ‘गौर्स’ने केला आहे.
फातोर्डा स्टेडियम आणि आशियाई चॅम्पियन्स लीगचे नाते गोव्यासाठी खास राहिले आहे. यापूर्वी अल नासर सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध दिलेली झुंज आणि याच मैदानात ब्रायसन फर्नांडिसने एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये भारतासाठी नोंदवलेला पहिला ऐतिहासिक गोल, या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. याच शौर्याचा वारसा पुढे नेत गोवा संघ आपल्या पहिल्या गुणांच्या शोधात मैदानात उतरेल.
दोन्ही संघ विजेतेपदासाठी सज्ज
या सामन्यात दोन्ही संघ एका आत्मविश्वासासह मैदानात उतरत आहेत. ताजिकिस्तानच्या एफसी इस्तिकलोल संघाने सलग १२ व्यांदा आपल्या देशातील लीग स्पर्धा जिंकून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पहिल्या लढतीत त्यांनी गोव्याचा २-० ने पराभव केला होता, ज्यामुळे बाद फेरीत जाण्याच्या त्यांच्या आशा अद्याप जिवंत आहेत.
दोन आठवड्यांपूर्वीच एफसी गोव्याने याच फतोर्डा मैदानावर ईस्ट बंगालचा पेनल्टीवर पराभव करत सलग दुसऱ्यांदा ‘सुपर कप’ पटकावला आहे. या ताज्या जेतेपदामुळे खेळाडूंचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
प्रशिक्षकांसह खेळाडूंचा निर्धार
मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली संघ कोणत्याही दबावाशिवाय मुक्तपणे खेळण्यासाठी उत्सुक आहे. संघाचा गोलरक्षक लारा याने खेळाडूंची मानसिकता स्पष्ट करताना सांगितले की, सामन्यांमधील अंतर आणि अनिश्चिततेमुळे हा प्रवास कठीण होता, पण आम्ही एक मजबूत गट आहोत आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. विजयाची भूक, घरच्या चाहत्यांचा पाठिंबा आणि सन्मानाची लढाई यामुळे एफसी गोवा विरुद्ध एफसी इस्तिकलोल हा सामना फतोर्डाच्या विद्युतझोतात अत्यंत रोमांचक होण्याची चिन्हे आहेत.
आजचा सामना
सामना : एफसी गोवा वि. एफसी इस्तिकलोल
दि : २४ डिसेंबर २०२५
वेळ : सायं. ७:३० वाजता
मैदान : पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, फातोर्डा
एफसी गोवा ‘आयएसएल’साठी सज्ज
एएफसी चॅम्पियन्स लीग टू मधील आपला आशियाई प्रवास संपवून एफसी गोवा संघ आता पुन्हा एकदा आपले पूर्ण लक्ष इंडियन सुपर लीग (आयएसएल) २०२५-२६ च्या जेतेपदाकडे वळवणार आहे. सुपर कपमधील विजयाने आत्मविश्वास उंचावलेला गोवा संघ आगामी आठवड्यांत काही महत्त्वाच्या लढतींसाठी सज्ज होणार आहे.