ऑस्ट्रेलियाचा ॲशेस मालिकेवर कब्जा

मालिका ३-० ने जिंकली : ॲडलेड कसोटीत इंग्लंडचा ८२ धावांनी पराभव

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
21st December, 10:59 pm
ऑस्ट्रेलियाचा ॲशेस मालिकेवर कब्जा

ॲडलेड : येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ८२ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने ॲशेस २०२५-२६ मालिकेवर आपले नाव कोरले आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-० अशी अजिंक्य आघाडी घेतली असून, उर्वरित दोन सामने बाकी असतानाच ॲशेस पुन्हा एकदा आपल्या खिशात घातले आहेत.
मात्र, मालिका जिंकूनही ऑस्ट्रेलियन संघासाठी आनंदासोबतच चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. चौथ्या कसोटीपूर्वी कर्णधार पॅट कमिन्स आणि अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन यांच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने सर्वच विभागांत इंग्लंडवर वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी निर्णायक क्षणी विकेट्स घेतल्या, तर फलंदाजांनी आवश्यक धावा जोडत सामन्यावर पकड मजबूत केली. अखेर इंग्लंडचा ८२ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने मालिकेतील तिसराही सामना जिंकला. या विजयामुळे इंग्लंडसाठी उर्वरित सामने केवळ सन्मानासाठीची लढाई ठरले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. ॲडलेड कसोटीत त्याने ६ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे कमिन्स सध्या जखमी नाही. मात्र, शरीरावरील ताण कमी ठेवण्यासाठी आणि पुढील सामन्यांसाठी तंदुरुस्त राहण्याच्या दृष्टीने तो मेलबर्न कसोटीतून विश्रांती घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यासंदर्भात कमिन्स म्हणाला, आम्ही मालिका जिंकली आहे, त्यामुळे माझे काम पूर्ण झाल्यासारखे वाटते. आम्ही पुन्हा एकदा धोका आणि शरीरावरील ताण याचा आढावा घेऊ. मेलबर्न कसोटीत खेळायचे की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यानंतर सिडनी कसोटीबद्दल विचार केला जाईल. मालिका जिंकेपर्यंत आम्ही धोका पत्करला होता.
दुसरीकडे, अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन याच्या दुखापतीने ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या आहेत. ॲडलेड कसोटीच्या पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. स्कॅननंतर लायन कुबड्यांच्या सहाय्याने चालताना दिसला, ज्यामुळे त्याची दुखापत गंभीर असल्याचे संकेत मिळाले आहेत. अवघ्या चार दिवसांत मेलबर्न कसोटी सुरू होत असल्याने, लायनचे खेळणे कठीण मानले जात आहे. लायन अनुपस्थित राहिल्यास, टॉड मर्फी किंवा मॅथ्यू कुहनेमन यांना संघात संधी दिली जाऊ शकते.
जर पॅट कमिन्स विश्रांती घेत असेल, तर चौथ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथकडे संघाचे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता आहे. स्मिथ ॲडलेड कसोटीपूर्वी ‘व्हर्टिगो’ (चक्कर येणे) या त्रासामुळे संघाबाहेर गेला होता. मात्र आता तो तंदुरुस्त असल्याने त्याचे संघात पुनरागमन अपेक्षित आहे.
मालिका जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना कमिन्सने सांगितले की, सलग तीन कसोटी सामने जिंकणे हे अत्यंत समाधानकारक आहे. संघाने प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
ॲशेसमधील ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
इंग्लंडचा दशकभराचा दुष्काळ : इंग्लंडला २०१५ पासून एकदाही ॲशेस मालिका जिंकता आलेली नाही.
७४ वी ॲशेस मालिका : यापैकी ऑस्ट्रेलियाने ३५ वेळा, तर इंग्लंडने ३२ वेळा विजेतेपद पटकावले आहे.
२००० नंतरचा दबदबा : गेल्या २४ वर्षांत झालेल्या १४ ॲशेस मालिकांपैकी ९ वेळा ऑस्ट्रेलिया विजयी ठरला आहे.

मागील ५ ॲशेस मालिकांचे निकाल :
२०१७-१८ : ऑस्ट्रेलिया ४-० ने विजयी
२०१९ : मालिका ड्रॉ (चषक ऑस्ट्रेलियाकडे)
२०२१-२२ : ऑस्ट्रेलिया ४-० ने विजयी
२०२३ : मालिका ड्रॉ (चषक ऑस्ट्रेलियाकडे)
२०२५-२६ : ऑस्ट्रेलिया ३-० ने आघाडी (२ सामने बाकी)

इंग्लंडसाठी आता सन्मानाची लढाई
पर्थ, ब्रिसबेन आणि ॲडलेड येथे सलग तीन पराभव स्वीकारल्यानंतर बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे. मालिका हातातून निसटली असली, तरी उर्वरित दोन कसोटी सामने जिंकून सन्मान राखण्याचे आव्हान इंग्लंडसमोर आहे. ॲशेस मालिकेतील चौथा सामना ‘बॉक्सिंग डे’ कसोटी म्हणून २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.