स्नेहल कवठणकरचे नाबाद शतक : कौशिक, दीपराजचे प्रत्येकी ४ बळी

पणजी : सलामीवीर स्नेहल कवठणकरचे नाबाद शतक तसेच कर्णधार दीपराज गावकर व वासुकी कौशिक यांनी घेतलेल्या प्रत्येकी चार बळींच्या जोरावर गोव्याने विजय हजारे ट्रॉफी एलिट स्पर्धेत विजयी सलामी देताना छत्तीसगडचा ६ गडी व ३५ चेंडू शिल्लक ठेवत दारुण पराभव केला. गोव्याने छत्तीसगडचा डाव ४८.५ षटकांत २३३ धावांत संपवला. यानंतर गोव्याने ४४.१ षटकांत केवळ ४ गडी गमावून २३४ धावा केल्या. जयपूर येथील जयपुरिया विद्यालय मैदानावर हा सामना बुधवारी खेळविण्यात आला. स्नेहल कवठणकर या सामन्याचा मानकरी ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करताना गोव्याला शतकी सलामीचा लाभ झाला. कश्यप बखले याने आपला शानदार फॉर्म कायम ठेवताना स्नेहल कवठणकरसह गोवा संघाला २०.५ षटकांत १०१ धावांची सलामी दिली. कश्यपने ६८ चेंडूंत ४८ धावा केल्या. अभिनव तेजराणा (१३) व सुयश प्रभुदेसाई (२) लवकर बाद झाल्याने गोव्याची ३ बाद १३० अशी स्थिती झाली होती. स्नेहल कवठणकर व व ललित यादव यांनी चौथ्या गड्यासाठी ७३ धावा जोडत गोवा संघाला दोनशेपार नेले. ललितने ४३ धावांचे योगदान दिले. स्नेहलने आपल्या नाबाद १०७ धावांच्या खेळीत ११६ चेंडूंचा सामना करताना १० चौकार व १ षटकार लगावला. कर्णधार दीपराज गावकर ११ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून गोव्याने छत्तीसगडला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. तिवारी व पांडे यांनी छत्तीसगडला ४३ धावांची सलामी दिली. कौशिकने तिवारीला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर काही षटकांतच त्यांची ३ बाद ६४ अशी स्थिती झाली. यष्टिरक्षक मयंक वर्मा (६४) व कर्णधार अमनदीप खरे (७६) यांनी चौथ्या गड्यासाठी ११४ धावांची भागीदारी करत संघाचा कोसळता डोलारा सावरला. दीपराजने मयंकला बाद करत ही जोडी फोडल्यानंतर छत्तीसगडच्या डावाला उतरती कळा लागली. ३ बाद १७८ वरून त्यांची ८ बाद २०२ अशी अवस्था झाली. कौशिकने शेवटचे दोन्ही गडी लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत छत्तीसगडचा डाव २३३ धावांत संपवला. गोवा संघाकडून कर्णधार दीपराजने १० षटकांत केवळ ३५ धावांत ४ गडी बाद केले. कौशिकने ९.५ षटकांत ४० धावांत ४ गडी बाद करत त्याला तोलामोलाची साथ दिली. युवा समित मिश्राने १ व अनुभवी फिरकीपटू दर्शन मिसाळने १ गडी बाद केला. गोव्याचा पुढील सामना २६ रोजी हिमाचल प्रदेशशी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
छत्तीसगड : ४८.५ षटकांत सर्वबाद २३३ (अमनदीप खरे ७६, मयंक वर्मा ६४, एजी तिवारी २९, शुभम अगरवाल नाबाद १९, आयुष पांडे १७, अवांतर ६, दीपराज गावकर ३५-४, कौशिक व्ही. ४०-४, दर्शन मिसाळ ३९-१, समित मिश्रा ४२-१) पराभूत वि. गोवा: ४४.१ षटकांत ४ बाद २३४ (स्नेहल कवठणकर नाबाद १०७, कश्यप बखले ४८, ललित यादव ४३, अभिनव तेजराणा १३, दीपराज गावकर नाबाद १३, सुयश प्रभुदेसाई २, शुभम अगरवाल ७३-३, अजय मंडल ४०-१)