७२ स्थानिकांचाही आढळला सहभाग

म्हापसा: गोवा पोलिसांनी २०२५ या वर्षात अंमलीपदार्थ तस्करीविरुद्ध राबवलेल्या धडक मोहिमेला मोठे यश आले आहे. १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत पोलिसांनी राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करून सुमारे ७८ कोटी ४५ लाख रुपये किमतीचे २३३ किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. या कारवाईत ३२ विदेशी नागरिकांसह एकूण २०६ जणांना अटक करण्यात आली असून, राज्यात अंमलीपदार्थांचे जाळे विस्तारू पाहणाऱ्या तस्करीवर मोठा प्रहार करण्यात आला आहे.
अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (NDPS) वर्षभरात एकूण १५९ गुन्हे नोंदवण्यात आले. यामध्ये उत्तर गोवा पोलिसांनी सर्वाधिक ७५ गुन्हे नोंदवत ८४ किलोहून अधिक ड्रग्ज हस्तगत केले, तर दक्षिण गोवा पोलिसांनी ३६ गुन्ह्यांची नोंद केली. गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) १९ गुन्ह्यांतून तब्बल ५७ कोटी ८५ लाख रुपयांचे सर्वाधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करून तस्करीचे मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे. अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने (एएनसी) २८ गुन्हे नोंदवून १८ कोटींहून अधिक किमतीचा साठा जप्त केला, तर कोकण रेल्वे पोलिसांनीही एका कारवाईत ८ किलो ड्रग्ज हस्तगत केले आहे.
अटक करण्यात आलेल्या २०६ आरोपींचे विश्लेषण केले असता, यात ७२ स्थानिक गोमंतकीय तरुणांचा सहभाग असणे ही चिंतेची बाब ठरली आहे. उर्वरित आरोपींमध्ये १०२ परप्रांतीय आणि ३२ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. अटक केलेल्या विदेशी नागरिकांमध्ये सर्वाधिक १० नायजेरियन नागरिक असून नेपाळ, रशिया, जर्मनी, स्वीडन, इस्रायल आणि फ्रान्ससह इतर देशांतील तस्करांनाही पोलिसांनी गजाआड केले आहे.
या मोहिमेमुळे अंमलीपदार्थांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, किनारपट्टी भागात पोलिसांनी गस्त वाढवली आहे. येणाऱ्या काळातही अमली पदार्थांविरोधातील हे अभियान अधिक तीव्र केले जाईल. पोलीस दल यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.