मंदिराच्या विश्वस्तांवर कोट्यवधींचा गैरव्यवहार आणि दागिन्यांच्या चोरीचा आरोप

लोणावळा: महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात आणि एमपीतील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान, कोळी समाजाची कुलदैवत कार्ला येथील आई एकवीरा देवी देवस्थानच्या कारभारावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचा आणि देवीच्या मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारल्याचा गंभीर आरोप खुद्द पुजाऱ्यांनी केल्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस आणि धर्मदाय आयुक्तांकडे दाद मागण्यात आली असून, देवस्थानच्या पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

देवस्थानचे पुजारी गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक गौप्यस्फोट करत ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्या मते, देवस्थानमध्ये केवळ पैशांचीच नव्हे, तर भाविकांचीही मोठी फसवणूक होत आहे. व्हीआयपी दर्शनासाठी बनावट पावत्या छापून भाविकांकडून रोखीने पैसे उकळले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय, भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू आणि दागिन्यांमध्ये मोठी तफावत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या 'बनावट पावती घोटाळ्या'मुळे देवस्थानच्या उत्पन्नाला मोठा चुना लावला जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आर्थिक गैरव्यवहारासोबतच पुजाऱ्यांनी ट्रस्टच्या कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले आहेत. देवस्थानच्या मालकीच्या 'इनोव्हा' आणि 'फॉर्च्युनर' यांसारख्या महागड्या गाड्यांचा वापर देवीच्या कामासाठी न होता वैयक्तिक आणि राजकीय कारणांसाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी पुणे धर्मदाय आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून प्रशासन आता देवस्थानच्या तिजोरीचा आणि मालमत्तेचा तपास करणार आहे.

दरम्यान, देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून ही केवळ बदनामीची खेळी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. योग्य वेळी पुराव्यानिशी आपली बाजू मांडू, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र, या आरोप-प्रत्यारोपामुळे भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, भक्तीच्या या पवित्र स्थानावरील विश्वासाला तडा जाऊ नये, अशी भावना सामान्य भाविकांकडून व्यक्त होत आहे.