भारतातील रेबीज लसीकरण संशयाच्या भोवऱ्यात!

नवी दिल्ली: भारतात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी 'अभयरॅब' (ABHAYRAB) ही रेबीज प्रतिबंधक लस बनावट असून ती या जीवघेण्या आजारावर प्रभावी नसल्याचा धक्कादायक इशारा ऑस्ट्रेलियाच्या सरकारी आरोग्य संस्थेने दिला आहे. ऑस्ट्रेलियन टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (ATAGI) शुक्रवारी जारी केलेल्या या इशाऱ्यामुळे भारतीय आरोग्य यंत्रणेत आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनुसार, नोव्हेंबर २०२३ पासून भारतात या बनावट लसीचा पुरवठा केला जात आहे. या लसीमध्ये रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेले सक्रिय घटक योग्य प्रमाणात नाहीत, ज्यामुळे ही लस घेतल्यावरही रेबीजपासून संरक्षण मिळत नाही. ही लस प्रामुख्याने भारतात घेतली जात असल्याने, ऑस्ट्रेलियाने अशा प्रवाशांना सतर्क केले आहे ज्यांनी नोव्हेंबर २०२३ नंतर भारतात ही लस घेतली होती. अशा लोकांनी तो डोस अवैध मानून 'राबीपूर' किंवा 'व्हेरोरॅब' सारख्या मान्यताप्राप्त लसींचे डोस पुन्हा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारतासाठी हा इशारा अत्यंत कळीचा मानला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे १८ ते २० हजार लोकांचा मृत्यू रेबीजमुळे होतो. सरासरी दर ३० मिनिटांनी एका व्यक्तीचा या आजाराने बळी जातो. रेबीजची लक्षणे एकदा दिसू लागली की त्यावर कोणताही खात्रीशीर उपचार उपलब्ध नाही; त्यामुळे वेळेवर आणि योग्य गुणवत्तेची लस मिळणे हेच रुग्णाचे प्राण वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे.
अलीकडेच महाराष्ट्रातील ठाणे येथे एका सहा वर्षांच्या मुलीचा रेबीजने झालेला मृत्यू चर्चेत आहे. त्या मुलीला लसीचे चार डोस देऊनही तिचा प्राण वाचू शकला नाही. यामुळे लसीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने दिलेला हा इशारा भारतीय लसीकरण मोहिमेतील त्रुटींकडे लक्ष वेधणारा ठरला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, ज्यांनी नोव्हेंबर २०२३ नंतर 'अभयरॅब' लस घेतली आहे किंवा ज्यांना आपल्या लसीचा ब्रँड माहीत नाही, त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पडताळणी करून गरज पडल्यास पुन्हा नोंदणीकृत लसीचा डोस घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ठरणार आहे.
