
बदलत्या हवामानाचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत असतो, मात्र नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार हवामानातील अचानक होणारे बदल मायग्रेनच्या रुग्णांसाठी अत्यंत क्लेशदायक ठरू शकतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमधील अभ्यासानुसार, मायग्रेनच्या सुमारे १६.५ टक्के प्रकरणांमध्ये अचानक वाढलेली थंडी आणि ९.६ टक्के प्रकरणांमध्ये अचानक वाढलेली उष्णता हे मुख्य ट्रिगर ठरत आहेत. तापमान संवेदनशील रुग्णांमध्ये हे प्रमाण २९ टक्क्यांपर्यंत पोहोचत असल्याने थंडीच्या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

मायग्रेन ही केवळ साधी डोकेदुखी नसून ती एक गंभीर न्यूरोलॉजिकल समस्या आहे. यात मेंदूतील मज्जातंतूंची क्रिया असामान्य होऊन वेदना निर्माण करणारी रसायने बाहेर पडतात. यामुळे डोक्याच्या एका भागात तीव्रप्रमाणात धडधडल्यासारख्या वेदना होतात. या वेदना अनेक तास किंवा दिवसांपर्यंत टिकू शकतात. हवामान बदलल्यावर हवेचा दाब आणि आर्द्रतेमध्ये वेगाने बदल होतात. याचा परिणाम मेंदूतील 'बारोरिसेप्टर्स'वर होतो. यामुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचन आणि प्रसरण होऊन तीव्र वेदना सुरू होतात. यासोबतच मळमळ, उलट्या आणि प्रकाश किंवा आवाजाची संवेदनशीलता वाढणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.
केवळ हवामानच नव्हे, तर आपली जीवनशैली आणि आहारही मायग्रेनला निमंत्रण देऊ शकतात. दीर्घकाळ उपाशी राहणे, डिहायड्रेशन, अपुरी झोप आणि ताणतणाव यामुळे या समस्येची तीव्रता वाढते. खाण्यापिण्याच्या सवयींबाबत बोलायचे झाले तर कॅफिनयुक्त पेये, अल्कोहोल, प्रक्रिया केलेले मांस, चॉकलेट आणि जास्त मीठ असलेले पदार्थ मायग्रेनला ट्रिगर करू शकतात. तसेच उच्च रक्तदाब, सायनस इन्फेक्शन, थायरॉईड असंतुलन आणि ॲनिमिया यांसारख्या आरोग्य स्थिती असलेल्या व्यक्तींना मायग्रेनचा त्रास अधिक गंभीर स्वरूपात जाणवू शकतो.

मायग्रेनवर पूर्णपणे कायमस्वरूपी उपचार करणे कठीण असले तरी, जीवनशैलीत बदल करून त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. अचानक होणाऱ्या वेदनांपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी कपाळावर किंवा मानेवर थंड शेक देणे, शांत आणि अंधाऱ्या खोलीत विश्रांती घेणे, आल्याचा चहा घेणे आणि भरपूर पाणी पिणे हे घरगुती उपाय प्रभावी ठरतात. मायग्रेनची लक्षणे सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळी असल्याने, रुग्णांनी आपल्या ट्रिगर्सची ओळख पटवून वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे आणि नियमित आहार-विहाराचे पालन करणे आरोग्यासाठी हिताचे ठरेल.

नोट : सदर आर्टिकल केवळ माहितीपर असून, आरोग्याशी निगडीत समस्यांवर आराम मिळवण्यासाठी नजीकच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.