दाबोळी ते दोना पावला रस्ता आज आणि उद्या ठराविक वेळेत राहणार बंद; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने केली पर्यायी मार्गाची सोय.

पणजी: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या २७ आणि २८ डिसेंबर २०२५ रोजी गोवा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि वाहतुकीच्या सुलभ व्यवस्थापनासाठी गोवा वाहतूक पोलीस विभागाने ट्रॅफिक ॲडव्हायझरी जाहीर केली आहे. राष्ट्रपतींच्या ताफ्याच्या मुव्हमेंटमुळे दाबोळी विमानतळ ते दोना पावला या मार्गावरील वाहतूक ठराविक वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. फक्त आपत्कालीन वाहनांना ये-जा करण्यास मुभा असेल.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी दाबोळी विमानतळावरून दोना पावला येथे जातील आणि २८ डिसेंबर रोजी सकाळी पुन्हा दाबोळी विमानतळाकडे रवाना होतील. या प्रवासादरम्यान चिखली,कुठ्ठाळी, नवीन झुआरी पूल आणि बांबोळीमार्गे जाणारा दाबोळी ते दोना पावल हा रस्ता २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत आणि २८ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० ते ९:३० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना या काळात या मार्गावरून येण्या-जाण्याची मुभा असेल.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने काही पर्यायी व्यवस्था केल्या आहेत. वेर्णा येथील बिर्ला क्रॉस जंक्शनवरून दाबोळी विमानतळाकडे जाण्यासाठी प्रवाशांना राष्ट्रीय महामार्ग ५६६ चा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विमान प्रवाशांनी विमानाची वेळ चुकणार नाही याची दक्षता घेत आपले नियोजन वेळेआधीच करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, व्हीव्हीआयपी मार्गावर वाहने उभी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून विविध ठिकाणी वाहतुकीचे नियमन आणि वळण देण्यात येणार आहे. जनतेने सुरक्षित वाहतुकीसाठी पोलीस दलाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक (वाहतूक) यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत गोवा, कर्नाटक आणि झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. २७ डिसेंबरला त्या गोव्याला भेट देतील. २८ डिसेंबरला कर्नाटकातील कारवारमध्ये पाणबुडी सफारी, तर २९ आणि ३० डिसेंबरला झारखंडमधील विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि 'एनआयटी' पदवीदान समारंभाला त्या उपस्थित राहून संबोधित करतील.