पर्यायी मार्गाची व्यवस्था. आदेश जारी.

पणजी : पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या बांधकामाचा वेग वाढवण्यासाठी आणि वाहतूक नियोजनाचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. २ जानेवारी २०२६ रोजी ओडीपी (बायपास) रस्ता ते दामियान दी'गोवा आणि कदंब हॉटेल ते ओ'कोकेरो जंक्शन या दरम्यानचा महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी एका दिवसाकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून, या काळात पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवण्यात येईल. महामार्गाचे हे दोन भाग बंद राहतील, तर उर्वरित भागातील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

या एका दिवसाच्या बंदमागचा मुख्य उद्देश म्हणजे महामार्गाचे काम सुरू असताना वाहतुकीवर काय परिणाम होतो, याचा प्रत्यक्ष आढावा घेणे हा आहे. आदेशानुसार, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना चढणीमुळे म्हापसाच्या बाजूने ओडीपी रस्त्यावर जाणे कठीण जाऊ शकते, हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरील एक लेन म्हापसा ते पणजी प्रवासासाठी खुली ठेवली जाणार आहे. याव्यतिरिक्त, वाहतूक वळवण्यासाठी वापरले जाणारे पर्यायी रस्ते सुस्थितीत असावेत, तेथे पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी आणि रस्त्याच्या कडेची झुडुपे हटवून वीज वाहिन्यांची उंची योग्य असल्याची खात्री करावी, असे स्पष्ट निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतुकीच्या सुलभतेसाठी कंत्राटदारावर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. २ जानेवारीला सकाळी उड्डाणपुलावरून वाहतूक बंद असेल, मात्र रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या आपत्कालीन वाहनांसाठी तसेच वाहतूक कोंडी झाल्यास दोन्ही बाजूंनी समर्पित लेन उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटदाराने दोन्ही बाजूंना 'ट्रॅफिक मार्शल' नियुक्त करणे अनिवार्य आहे. तसेच, महामार्गावर एखादे वाहन बंद पडल्यास ते तातडीने हटवण्यासाठी क्रेनची व्यवस्था करावी लागेल. पर्वरी वाहतूक विभाग किंवा स्थानिक पोलीस स्थानकाच्या सूचनेशिवाय रस्ते बंद करू नयेत आणि समन्वयासाठी एका सुपरवायझरची नेमणूक करून त्याचा संपर्क क्रमांक पोलिसांना द्यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.