मराठा समाजाने सामाजिक बांधिलकी जपून पुढे जावे : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पर्वरीत समाज संकुलाचे लोकार्पण

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
32 mins ago
मराठा समाजाने सामाजिक बांधिलकी जपून पुढे जावे : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी : मराठा समाजाने सामाजिक बांधिलकी जपत इतर समाजांना सोबत घेऊन पुढे जावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. शनिवारी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या पर्वरी येथील संकुलाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार उल्हास तुयेकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये, राजेश फळदेसाई, संस्थेचे अध्यक्ष सुहास फळदेसाई व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमुळे पोर्तुगीजांकडून होणारे गोव्यातील धर्मांतर आणि मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे प्रकार कमी झाले. गोव्याच्या प्रगतीमध्ये मराठा समाजाचे मोठे योगदान आहे. यापुढेदेखील असेच योगदान देण्याची जबाबदारी समाजाच्या सध्याच्या नेतृत्वाची आहे. समाजाने गरजू युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याचा जो ठराव घेतला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. या केंद्रात गोव्यासह राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दिले जावे.


ते पुढे म्हणाले की, नव्याने बांधण्यात आलेले संकुल समाजाला नवी ऊर्जा, प्रेरणा आणि दिशा देईल. संकुलातील विविध हॉलच्या माध्यमातून समाजाला उत्पन्नही मिळेल. या उत्पन्नाचा वापर समाजातील गरजू व्यक्तींसाठी केला जावा. याद्वारे महिला आणि युवकांचे सक्षमीकरण होणे अपेक्षित आहे. समाजाचे कार्य गरजू व्यक्तींना पाठबळ देण्यासाठी, सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि धार्मिक परंपरा पुढे नेण्यासाठी असावे, याची खात्री समाजाने बाळगावी.




मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कुणापुढेही लोटांगण न घालता स्वतःचे कर्तृत्व, सामर्थ्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजाने पुढे जावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती; त्याचप्रमाणे आजही आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. तत्पूर्वी, डॉ. गावकर यांना 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जातिनिहाय सर्वेक्षण करणार

संस्थेचे अध्यक्ष सुहास फळदेसाई म्हणाले की, राज्यात मराठा समाजाची नेमकी संख्या किती आहे, हे जाणून घेण्यासाठी 'जातिनिहाय सर्वेक्षण' करण्यात येणार आहे. सध्या हा प्रकल्प केपे तालुक्यात सुरू असून लवकरच इतर तालुक्यांतही असे सर्वेक्षण केले जाईल.


हेही वाचा