
माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, हिवाळा सुरू आहे, मस्त थंड वातावरण आहे. कडकडून भूक लागते ना? चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ खाऊन तुम्ही तुमची शारीरिक ताकद वाढवत आहात ना? आपण मागच्याच आठवड्यात बघितलं की हिवाळा हा तसा हेल्दी ऋतू, पण तरीसुद्धा काही जणांना मात्र थंडीत दात आणि हिरड्यांचे त्रास सतावतात. कधी दात दुखतात, कधी थंड किंवा गोड काही खाल्लं की दात सणसणतात, आंबट पदार्थ खाल्ले की दात शिवशिवतात, तर कधी हिरड्या सुजतात, हिरड्यांमधून रक्त येतं. हे सगळे त्रास होऊ नये म्हणून एक विशेष उपाय आपल्या आयुर्वेदात सांगितला आहे. त्रास झाल्यानंतर उपाय तर आहेतच, पण त्रास होऊच नये म्हणूनसुद्धा उपाय सांगितलेले आहेत. आहे की नाही खास?
त्यातला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे — ऑईल पुलिंग.
ऑईल पुलिंग म्हणजे काय व ते कसं करावं?
ऑईल पुलिंगचे फायदे भरपूर आहेत. करायचंय काय, तर वाटीत तेल घ्यायचं. ती तेलाची वाटी गरम पाणी असलेल्या पातेल्यात, पाणी वाटीत जाणार नाही अशी ठेवायची. तेल कोमट म्हणजेच हलकं गरम होतं. हे कोमट तेल तोंडात घ्यायचं पण प्यायचं नाही हा! तोंडात थोडी जागा रिकामी ठेवायची. तेल तोंडात धरून हनुमानासारखं तोंड फुगवायचं. त्यानंतर तोंडात लाळ सुटते आणि पूर्ण तोंड तेल व लाळेने भरतं. तोंडात हे सगळं धरून ठेवता येत नाही असं वाटलं म्हणजेच तोंड पूर्ण भरलं की, तोंडातलं सगळं मिश्रण टाकायचं आणि कोमट पाण्याने चूळ भरायची. याला संस्कृत भाषेत 'गंडूष' आणि इंग्रजीत 'ऑईल पुलिंग' असं म्हणतात.
ज्यांचे दात दुखतात त्यांनी रोज सकाळी व संध्याकाळी ऑईल पुलिंग करावं. ज्यांना दातांचा कसलाच त्रास नाही, त्यांनीसुद्धा दिवसातून एकदा ऑईल पुलिंग करावं.
कोणते तेल वापरावे?
हिवाळ्यात ही दोन तेलं विशेष उपयोगी आणि सहज बाजारात मिळणारी आहेत:
तिळाचे तेल
खोबरेल तेल
ज्यांना तेलाची चव आवडत नाही, त्यांनी १ चमचा तेल
आणि अर्धी वाटी कोमट पाणी असं मिश्रण तोंडात धरावं. यानेसुद्धा दात व हिरड्या मजबूत होतात.
ऑईल पुलिंग का करावं?
१. दात मजबूत आणि स्वच्छ राहतात.
२. तोंडाची दुर्गंधी दूर होते.
३. हिरड्या मजबूत होतात व निरोगी राहतात.
४. तोंड कोरडं पडत नाही.
५. दात दुखणे, हिरड्या सुजणे असे त्रास होत नाहीत.
६. ओठांना, जिभेला व्रण पडले असतील तर तेसुद्धा भरून येतात.
७. चेहऱ्याची त्वचासुद्धा तजेलदार दिसायला लागते.
८. दात स्वच्छ व निरोगी असले की पचन नीट होतं, आपल्या आवडीचे पदार्थ खाता येतात आणि आपली ताकदसुद्धा वाढते.
ऑईल पुलिंगचे कितीतरी फायदे आहेत. दात व हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी सकाळी किंवा रात्री दात घासल्यानंतर गंडूष करा आणि हिवाळ्याचा आनंद घ्या. आहे की नाही सोपा आणि फायदेशीर उपाय? चला मग आजच करून बघा.

वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य