गौरव, सौरभ लुथरा थायलंडला पसार

बर्च बाय रोमिओ लेन अग्नितांडव प्रकरण : दिल्लीत आस्थापनाच्या गोवा प्रमुखाला अटक


10 mins ago
गौरव, सौरभ लुथरा थायलंडला पसार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये घडलेल्या अग्नितांडव प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि क्लबचे मालक गौरव लुथरा व सौरभ लुथरा हे थायलंडला पसार झाले आहेत. क्लबचे गोवा प्रमुख करणसिंग कोहली (४९, दिल्ली) याला गोवा पोलिसांनी दिल्ली येथे अटक केली.
शनिवारी रात्री क्लबला भीषण आग लागून त्यात पाच पर्यटक आणि २० कर्मचारी मिळून एकूण २५ जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी भा.न्या.सं.च्या १०५, १२५, १२५(अ), १२५(ब), २८७ व ३(५) कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अटक टाळण्याच्या हेतूने संशयित लुथरा बंधू थायलंडला गेले असून ते फुकेत शहरात असल्याची माहिती गोवा पोलिसांना मिळाली आहे. आग दुर्घटना घडल्यानंतर पहाटे ५.३० च्या विमानाने दोघेही पसार होण्यात यशस्वी ठरले. या दोघांना पकडण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या गोवा पोलीस पथकाने संशयितांचे घर आणि आस्थापनाची झडती घेतली. मात्र तिथे ते सापडले नाहीत. त्यानंतर संशयित हे देशाबाहेर गेल्याचे आढळून आले.
गोवा पोलिसांच्या पथकाने संशयित भरत कोहली याला सोमवारी पहाटे अटक केली. संशयित हा रोमिओ लेनचा गोवाप्रमुख असून गोव्यातील सर्व कारभार तो हाताळत होता. संशयिताला ट्रांझिट रिमांडवर मंगळवारी गोव्यात आणले जाणार आहे. दरम्यान, हणजूण पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेले राजीव निमाई मोडक (४९, दिल्ली), प्रियांशू कृष्णकुमार ठाकूर (३२, दिल्ली), राजीव रूद्रनाथ सिंघानिया (३२, उत्तर प्रदेश) व विवेक चंद्रभान सिंग (२७, उत्तर प्रदेश) यांना म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
क्लबच्या मालकाकडून दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त
क्लबचे मालक सौरभ लुथरा याने आगीच्या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बर्च बाय रोमिओ लेन येथे झालेल्या या दुर्दैवी दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल व्यवस्थापन दु:ख व्यक्त करते. या घटनेने आम्हीही हादरून गेलो असून भरून न येणाऱ्या या दु:खाच्या आणि जबरदस्त त्रासाच्या क्षणी संबंधित मृतांच्या व जखमींच्या कुटुंबियांसोबत अढळ एकजुटीने व्यवस्थापन उभे आहे, अशी पोस्ट त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केली आहे.
क्लबकडे देशी, विदेशी दारू विक्रीचा परवाना
शनिवारी आगीत खाक झालेल्या बर्च बाय रोमिओ लेन क्लबकडे देश व विदेशी बनावटीची दारू विक्रीचा परवाना होता. परवान्याची मुदत १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ अशी आहे. बिंग जीएस हॉस्पिटॅलिटी गोवा येथे बर्च माय रोमिओ लेन क्लब आस्थापनाला दारू विक्रीसाठी परवाना दिला होता. बर्च बाय रोमिओ लेनचे बांधकाम सीआरझेडमध्ये नसल्याने ते कायदेशीर असल्याचा निर्णय जीसीझेडएमएने दिला होता. तसेच त्यांच्याकडे दारू विक्रीसाठी अबकारी खात्याचा परवाना होता, हे स्पष्ट झाले आहे. क्लबचा व्यापारी परवाना मार्च २०२४ मध्ये संपुष्टात आला आहे.   

हेही वाचा