विरोधी पक्षांच्या आघाडीचा तिढा कायम; अंतिम निर्णय आज

काँग्रेसचा आरजीला नवीन प्रस्ताव : सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th December, 11:45 pm
विरोधी पक्षांच्या आघाडीचा तिढा कायम; अंतिम निर्णय आज

पणजी : जिल्हा पंचायत (झेडपी) निवडणुकीसाठी विरोधकांच्या आघाडीबाबतचा संभ्रम आणि गुढ अजूनही कायम आहे. युती होणार की नाही,बाबतचा अंतिम निर्णय रविवारी घेतला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून नवीन प्रस्ताव देण्यात आला असून, त्यावर विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी दिली. दरम्यान, युतीसंदर्भातील चर्चा सकारात्मक झाली असून अंतिम निर्णय रविवारीच होईल, असे काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

स्वतंत्र बैठका आणि चर्चा
काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी आघाडीचे घटक पक्ष असलेल्या रॅव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी (आरजी) आणि गोवा फॉरवर्ड यांच्या नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. विशेष म्हणजे तिन्ही पक्षांची एकत्र बैठक होऊ शकली नाही. प्रथम विजय सरदेसाई यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची स्वतंत्र चर्चा झाली, जी अर्धा तास चालली. त्यानंतर आरजीपी आणि काँग्रेस नेत्यांनी वेगळे बसून चर्चा केली, ही बैठक सुमारे दीड तास चालली.

आरजीची भूमिका आणि अटी
काँग्रेसने आम्हाला नवीन प्रस्ताव दिला आहे, मात्र तो सध्या जाहीर करू शकत नाही. आम्ही तो आमच्या पक्षाच्या समितीपुढे ठेवला असून, मान्यता मिळाली तरच आम्ही पुढील बैठकीला उपस्थित राहू. अन्यथा, यापुढे कोणतीही बैठक होणार नाही, हे आम्ही स्पष्ट केले आहे, असे मनोज परब यांनी नमूद केले. तसेच भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा पक्षात घेण्यासंबंधीची घटना आणि युतीची चर्चा चालू असताना काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करणे, हे मुद्देही आम्ही बैठकीत स्पष्टपणे मांडल्याचे परब म्हणाले.

काँग्रेसचा सकारात्मक दावा
बैठकीत काय चर्चा झाली आणि आघाडी पुढे कशी जाईल, हे रविवारी स्पष्ट होईल. युतीसंदर्भातील चर्चा सकारात्मक झाली आहे. आरजीपीने मागे काय बोलले होते आणि आता काय बोलत आहेत, हे महत्त्वाचे नाही. दोन्ही पक्षांची भूमिका सकारात्मक असून आता फक्त निर्णय जाहीर करणे बाकी आहे, असे माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

गोवा फॉरवर्डची भूमिका आणि खंत
आमची युती काँग्रेससोबत आधीपासून होती आणि पुढेही राहील. काँग्रेस हा आमचा मोठा घटक पक्ष असल्याने जागावाटपाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनाच आहे. मात्र, काँग्रेस आणि आरजीपी वेगळे बसून चर्चा करत आहेत, त्रिपक्षीय बैठक होत नाही, अशी खंत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

#Goa #ZillaPanchayatElection #CongressGoa #RGP #GoaForward #Alliance #ManikraoThakre #ManojParab #VijaySardesai
हेही वाचा