हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' क्लबला भीषण आग; २३ जणांचा होरपळून मृत्यू

आमदार मायकल लोबो यांनी केला अंदाज व्यक्त. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू.

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
just now
हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' क्लबला भीषण आग; २३ जणांचा होरपळून मृत्यू

पणजी: गोव्यातील हडफडे (Arpora) येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) या प्रसिद्ध क्लबमध्ये आज रविवार ७ डिसेंबर उत्तर रात्री १.०० च्या सुमारास भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २३ जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आमदार मायकल लोबो यांनी या दुर्दैवी घटनेला दुजोरा दिला आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा दल तसेच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. आगीची तीव्रता मोठी होती आणि यात क्लबचे मोठे नुकसान झाले आहे. बचाव पथके आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा अथक प्रयत्न करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत काही लोक जखमीही झाले असल्याची शक्यता आहे, परंतु जखमी आणि मृतांचा नेमका आकडा बचावकार्य पूर्ण झाल्यावरच स्पष्ट होईल. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गोव्याचे पोलीस महासंचालक (DGP) आलोक कुमार यांनी तातडीने हडफडे येथील घटनास्थळी धाव घेतली आहे आणि परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

या भीषण आगीमुळे क्लबच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गोव्यात हळहळ व्यक्त होत आहे. क्लबला आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आगीच्या कारणांचा सविस्तर तपास करत आहेत.

हेही वाचा