ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज : अंतिम मुदत ३१ डिसेंबर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य कर्मचारी आयोगातर्फे २१९ जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये ३० तलाठी, ४६ लॅब असिस्टंट, २६ पंचायत सचिव, १७ लॅब तंत्रज्ञ, १२ अकाऊंट क्लार्क, १२ अव्वल कारकून, २७ इन्वेस्टीगेटरसह अन्य पदांचा समावेश आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. अर्ज आयोगाच्या संकेतस्थळावरून केवळ ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना वाचण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
वरील सर्व जागा या ‘क’ गटातील कर्मचाऱ्यांसाठी आहेत. यामध्ये सर्चर, मत्स्योद्योग साहाय्यक अधीक्षक, वजन आणि माप निरीक्षक, कारखाने निरीक्षक व अनॅलिटीक साहाय्यक पदाच्या प्रत्येकी एका जागेवर भरती केली जाईल. लॅब तंत्रज्ञ, लॅब साहाय्यक, साहाय्यक अर्कायविस्ट श्रेणी दोन, कनिष्ठ संशोधक साहाय्यक यांच्या प्रत्येकी दोन जागांवर भरती होईल. कनिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञाच्या ७, माहिती साहाय्यकाच्या ६, निरीक्षकाच्या ५, स्टोअर कीपरच्या ४ जागांवर भरती केली जाईल.
नियमांनुसार काही जागा आरक्षित
एकूण जागांपैकी नियमांनुसार काही जागा या आरक्षित असणार आहेत. या जागांसाठी परीक्षांची तारीख संकेतस्थळावर लवकरच जाहीर केली जाईल. सर्व अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतले जाणार असल्याने अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज करता येणार नाहीत. अपात्र उमेदवारांनी अर्ज न करण्याची सूचना आयोगाने केली आहे.