सिक्कीममध्ये सर्वांत कमी बळी : दहा वर्षांत देशात ३.२९ लाख जणांनी गमावला जीव

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात २०१४ ते २०२३ या दहा वर्षांच्या कालावधीत महिन्याला सरासरी ३ महिलांचा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याने मृत्यू झाला होता. यादरम्यान संपूर्ण देशात ३.१९ लाख महिलांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार जून मालीआह यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरातून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेतर्फे कर्करोग नोंदणी प्रकल्प राबवला जात आहे. यानुसार २०१४ ते २०२३ मधील देशभरातील कर्करोगबाधितांची तसेच यामुळे आलेल्या मृत्यूंची आकडेवारी काढण्यात आली आहे. वरील दहा वर्षांत गोव्यात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याने एकूण ४४१ महिलांचा मृत्यू झाला होता. याचाच अर्थ वर्षाला सरासरी ४४ महिलांचा मृत्यू झाला होता.
राज्यात वरील कालावधीत सर्वाधिक ४८ मृत्यू २०२३ मध्ये झाले होते. तर २०१४ मध्ये सर्वांत कमी ४० मृत्यू झाले होते. २०१५ मध्ये ४१, २०१६ मध्ये ४२, २०१७ आणि २०१८ मध्ये प्रत्येकी ४३, २०१९ मध्ये ४४, २०२० मध्ये ४६, तर २०२१ आणि २०२२ मध्ये प्रत्येकी ४७ मृत्यूंची नोंद झाली होती. यादरम्यान देशात सुमारे ३.१८ लाख महिलांचा गर्भशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहारमध्ये अशा मृत्यूंचे प्रमाण अधिक होते. सिक्कीममध्ये सर्वांत कमी १०३ महिलांचा मृत्यू झाला होता.
देशभरात सुमारे १.२७ कोटी महिलांची चाचणी
देशात असंसर्गजन्य रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. या ‘एनसीडी’ पोर्टलनुसार ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत देशभरात सुमारे १.२७ कोटी महिलांची गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी चाचणी करण्यात आली होती. २०२४-२५ मध्ये १.७५ कोटी, तर २०२३-२४ मध्ये १.१५ कोटी महिलांची चाचणी करण्यात आल्याचे उत्तरात म्हटले आहे.
सहा वर्षांत ९.८३ कोटींचा निधी
उत्तरात म्हटले आहे की, असंसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीत केंद्र सरकारने गोव्याला ९.८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यातील मागील आर्थिक वर्षात सर्वाधिक ३.८० कोटी रुपये मंजूर केले होते.