मेरशी सत्र न्यायालयात १७ रोजी सुनावणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्यूटरचे इंद्रजीत कदम, अमेय कदम, स्मिता कदम यांच्यासह राहुल गाडवे, रूपाली गाडवे आणि शैलेश वाघ यांच्याविरोधात मेरशी येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी होणार आहे.
या प्रकरणी राजदीप गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्यूटरचे इंद्रजीत कदम, अमेय कदम, स्मिता कदम व इतरांनी तक्रारदाराला १ लाख रुपयावर महिन्याला ४५०० रुपये दोन वर्षासाठी देण्याचे आमिष दाखवले. तक्रारदाराने ३० जून २०२२ ते १५ मार्च २०२३ या कालावधीत आपल्या आणि पत्नीच्या बँक खात्यांतून १६ लाख रुपयांची गुंतवणूक केली. संशयितांनी २ लाख ६ हजार ५८२ रुपये व्याजापोटी दिले. गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत केली नाही. तक्रारदाराने अनेकदा संपर्क साधला असता, त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने म्हार्दोळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
एक संशयित फरार
पोलीस निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक झाकी हुसेन यांनी संशयितांविरोधात भारतीय दंड संहितेच्या, गोवा ठेवीदार व्याज संरक्षण कायद्याचे व इतर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी इंद्रजीत कदम, अमेय कदम, स्मिता कदम यांना अटक केली. शैलेश वाघ फरार आहे. या प्रकरणी पोलिसांनी वरील संशयितांसह राहुल गाडवे, रूपाली गाडवे आणि शैलेश वाघ यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.