जिल्हा पंचायत : काँग्रेस-आरजी आघाडीच्या आशा मावळल्या

समन्वयाचा अभाव : ७ मतदारसंघांत परस्परांविरुद्ध लढणार


33 mins ago
जिल्हा पंचायत : काँग्रेस-आरजी आघाडीच्या आशा मावळल्या

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला आस्मान दाखवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचे ठरवले होते. काँग्रेस, आरजी (रिव्हॉल्युशनरी गोवन्स) आणि गोवा फॉरवर्ड यांनी आघाडी करून लढणार असल्याचे घोषित केले होते; मात्र काँग्रेस आणि आरजी यांच्यात जागांबाबत एकमत न झाल्याने आघाडीच्या आशा मावळल्या आहेत. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील सात मतदारसंघांत दोन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी शनिवारी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आघाडीबाबत निर्णय घेतील, असे म्हटले आहे.
काँग्रेसने आतापर्यंत दोन याद्यांमधून २२ उमेदवार जाहीर केले आहेत. आरजीनेही दोन याद्यांमधून २६ उमेदवारांची घोषणा केली आहे. कळंगूट, सुकुर, रेईश-मागूश, चिंबल, उसगांव-गांजे, सांताक्रूझ आणि कुठ्ठाळी या सात मतदारसंघांत सध्या काँग्रेस आणि आरजीच्या उमेदवारांनी एकमेकांना आव्हान दिले आहे. याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, आघाडी व्हावी यासाठी आम्ही अद्यापही प्रयत्नरत आहोत. ज्या मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला होता, तो मतदरासंघ काँग्रेसकडेच राहिला पाहिजे. तो आमचा हक्कच आहे. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. आरजीने त्यांना हव्या असलेल्या मतदारसंघांची मागणी केली आहे; मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे ज्या २३ मतदारसंघांबाबत चर्चा सुरू आहे, ते सोडून आम्ही उर्वरित २२ मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले आहेत. शनिवारी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे गोव्यात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत आघाडीविषयीचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
आरजीचे प्रमुख मनोज परब म्हणाले, जे लोक काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये गेले आहेत, त्या फुटीर आमदारांना परत घेऊ नये, अशी आमची ठाम भूमिका आहे. पण काँग्रेससोबत आघाडीत असलेला घटक पक्ष गोवा फॉरवर्ड काँग्रेसच्या फुटीर आमदारांना आपल्या पक्षात घेत आहे आणि काँग्रेस त्यावर काहीच बोलत नाही. याचा अर्थ काँग्रेस फुटीर आमदारांबाबत फक्त बोलते, प्रत्यक्षात कारवाई काहीच करत नाही.

आरजीला आम्ही आठ दिवसांपूर्वीच आघाडीबाबतचा प्रस्ताव दिला होता; मात्र अद्याप त्यांचे उत्तर आलेले नाही. सांताक्रूझ मतदारसंघ आरजीपीला देण्याविषयी माझ्याशी बोलणी झालेली नाहीत. सर्व मतदारसंघांत आमच्या पक्षाची ताकत आहे. तरीही आघाडी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
अमित पाटकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

सध्यातरी काँग्रेसने आमच्यासोबत कोणताच समन्वय ठेवलेला नाही. आघाडीबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. आमच्याकडे आठ दिवसांपूर्वी आघाडीचा प्रस्ताव पाठवल्याचे पाटकर सांगत असतील; मात्र आमच्याकडे तसा प्रस्ताव आलेला नाही. आयत्या वेळी काँग्रेस आमच्याकडे नवा प्रस्ताव मागत असेल तर तो बालीशपणा आहे. आघाडीबाबत आम्ही आमचा निर्णय शनिवारी सायंकाळी जाहीर करणार आहोत.
मनोज परब, अध्यक्ष, आरजी

काँग्रेसने उद्या, उद्या करत आघाडीविषयीचा निर्णय घेण्यास खूपच वेळ घालवला. मतदानाला वेळ कमी राहिल्यामुळे आम्ही प्रचाराच्या दृष्टीने दोन पावले मागे राहिलो आहोत. आता आणखी वेळ वाया न घालवता आम्ही २६ मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली आहे. आघाडी होणार की नाही याबाबत शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करू.
- वीरेश बोरकर, आमदार, आरजी

हेही वाचा