युतीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रभारी माणिकराव ठाकरे आज गोव्यात

काँग्रेसची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December, 11:12 pm
युतीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रभारी माणिकराव ठाकरे आज गोव्यात

पणजी : विरोधी पक्षांच्या युतीबाबत चर्चा होऊनही निर्णय घेण्यात काँग्रेसला अडचण येत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे शुक्रवारी गोव्यात येत आहेत. काँग्रेस, आरजी आणि गोवा फॉरवर्ड युतीबाबतचा अंतिम निर्णय तेच घेतील, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले. ज्या मतदारसंघांमध्ये मतभेद नाहीत, त्या जागांचे उमेदवार काँग्रेसने जाहीर केले असून दुसरी यादीही तत्काळ घोषित करण्यात येणार आहे.

शुक्रवारी अंतिम निर्णय
निवडणूक समितीच्या बैठकीतही युतीवर चर्चा झाली. यावर अंतिम निर्णय शुक्रवारी गोव्यात येणारे प्रभारी माणिकराव ठाकरेच जाहीर करतील, असे पाटकर यांनी नमूद केले. गोवा फॉरवर्ड आणि आरजीसोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आरजीचा सावध पवित्रा
काँग्रेसने चर्चा सुरू असतानाच उमेदवार घोषित केल्याने नाराज झालेल्या आरजी पक्षाने देखील तातडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, काँग्रेसने ज्या मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले, त्या ठिकाणी आरजीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. आरजीने यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसची बैठक झाली.

जिंकलेल्या जागांवर तडजोड नाही!
ज्या मतदारसंघांत काँग्रेसला विजय मिळाला, त्या जागा इतर कोणत्याही पक्षाला दिल्या जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. आरजीने काँग्रेसच्या काही मतदारसंघांवर दावा केल्याने गोंधळ निर्माण झाला. सर्व विरोधी पक्षांची युती होणे काँग्रेसला फायद्याचे असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांनी प्रचारालाही सुरुवात केली असून यामुळे युतीबाबतची चर्चा अधिक गतीने सुरू असल्याचे पाटकर म्हणाले.

एकत्र येण्याची गरज
गोव्याच्या भवितव्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. युती झाली तर त्याचा आम्हाला फायदा आहे आणि पक्षाने युतीसंदर्भात निर्णय घेतलाच आहे, असे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी बैठकीनंतर सांगितले.

#Goa #CongressGoa #ManikraoThakre #ZillaPanchayatElection #GoaPolitics #Alliance #AmitPatkar