
मालवण : कोकणातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी (anganewadi) भराडी देवी (bharadi) जत्रेची तारीख निश्चित झाली आहे. देवीचा पारंपारिक कौल घेऊन यात्रेचा शुभमुहूर्त ठरवण्यात आला असून ९ फेब्रुवारी २०२६ पासून जत्रेला सुरुवात होणार आहे.
आंगणेवाडीतील जत्रेची खासियत म्हणजे ती कोणत्याही तिथीनुसार नसून फक्त देवीचा कौल घेऊनच ठरवली जाते. जत्रेच्या काळात लाखो भाविक येथे हजेरी लावतात. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रभरातून भक्त येथे मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
मालवण (malvan) तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी ही देवीची वाडी. ‘भराड’ म्हणजे माळरान, आणि देवी प्रकट झालेला भाग भराड असल्याने नाव पडले भराडी देवी. आंगणे (angane) कुटुंबियांचे हे खासगी देवस्थान मानले जात असले तरी दर्शन सर्वांसाठी खुले आहे. लाखो भाविक येथे नवस बोलतात, गाऱ्हाणी मांडतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी परत येतात.
यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहून जिवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकाना केंद्रबिंदु मानून भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली.
अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात. आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खासगी वाहनांच्या बुकिंग साठी चढाओढ लागणार आहे. प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाली आहे. राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षिय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवीत असल्याने ग्रामस्थ मंडळा बरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीच लागते. जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्व तयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे. जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्यानंतर श्री देवी भराडी मंदिर ३ ते ५ डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. याची भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.